Delhi Riots: दिल्ली दंगलीत पहिली शिक्षा, दरोडा आणि जाळपोळप्रकरणी एकास 5 वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 02:23 PM2022-01-20T14:23:09+5:302022-01-20T14:23:35+5:30
25 डिसेंबर 2020 रोजी मनोरी नावाच्या महिलेच्या घरात दरोडा टाकून आग लावण्यात आली होती.
नवी दिल्ली:दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या दंगल आणि हिंसाचाराप्रकरणी गुरुवारी न्यायालयाने पहिली शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने दिनेश यादव नावाच्या व्यक्तीला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पक्षकारांची बाजू मांडणारे अधिवक्ता आरसीएस भदौरिया यांनी याची पुष्टी केली. यादववर एका महिलेचे घर लुटणे आणि आग लावल्याचा आरोप आहे.
दिल्लीच्या गोकलपुरी येथील भागीरथी विहारमध्ये मनोरी या 70 वर्षीय महिलेच्या घरात चोरी आणि आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने त्याच भागातील रहिवासी असलेल्या दिनेश यादव याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ईशान्य दिल्लीतील भीषण दंगलीतील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे.
महिलेने कसाबसा जीव वाचवला
25 डिसेंबर 2020 रोजी मनोरी नावाच्या महिलेच्या घरात दरोडा टाकून आग लावण्यात आली होती. दंगलखोरांनी त्यांची गुरेही चोरुन नेली होती. 70 वर्षीय मनोरीने छतावरुन उडी मारली आणि हिंदू कुटुंबाच्या घरात लपून आपला जीव वाचवला होता. त्यानंतर पोलिसांनी कसेबसे त्या महिलेच्या कुटुंबीयांना वाचवले होते. दंगलीनंतर संपूर्ण कुटुंब 2 आठवडे दिल्लीबाहेर होते.
पोलिसांचे जबाब महत्वाचे
या प्रकरणी न्यायालयाने 2 पोलिसांचे जबाब महत्त्वाचे मानले आहेत. त्यांनी सांगितले की, दिनेश हा हिंसाचार करणाऱ्या जमावाचा भाग होता. मात्र, दिनेशला मनोरीचे घर जाळताना दिसले नाही. तथापि, न्यायालयाने म्हटले आहे की जर कोणी बेकायदेशीर जमावाचा भाग असेल तर तो इतर दंगलखोरांप्रमाणेच हिंसाचारासाठी तितकाच जबाबदार आहे.