दिल्ली दंगल प्रकरण : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 12:50 AM2020-09-15T00:50:25+5:302020-09-15T00:51:05+5:30
उमर खालिद याने चौकशीसाठी रविवारी हजर व्हावे, असा आदेश दिल्ली पोलिसांनी त्याला शनिवारी दिला होता. त्यानुसार तो हजर होताच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूपीएए) त्याला अटक करण्यात आली.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली न्यायालयाने सोमवारी १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खालिद याला दहशतवादविरोधी कायदा व बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्याखाली रविवारी अटक रात्री झाली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीसंबंधी त्याला अटक झाली आहे. उमर खालिद याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.
उमर खालिद याने चौकशीसाठी रविवारी हजर व्हावे, असा आदेश दिल्ली पोलिसांनी त्याला शनिवारी दिला होता. त्यानुसार तो हजर होताच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूपीएए) त्याला अटक करण्यात आली. याआधी ३१ जुलै रोजी उमर खालिद याची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली होती. उमर खालिदवर येत्या काही दिवसांत दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करतील. दिल्ली क्राइम ब्रँचच्या अमली पदार्थविरोधी शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार यांना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे उमर खालिदविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, खबºयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेली जातीय दंगल हा पूर्वनियोजित कट असून तो आखण्यात उमर खालिद, दानिश व अन्य संघटनांचे दोन सदस्य यांचा सहभाग होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौºयावर असतानाच्या दिवसांत लोकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक बंद पाडावी व आंदोलन सुरू करावे, असे आवाहन खालिद याने केले होते.
दिल्लीमध्ये दोन ठिकाणी केलेल्या चिथावणीखोर भाषणांमध्ये केले होते, असे या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
दंगलीसाठी केली पूर्वतयारी
जातीय दंगल घडवायची असल्याने दिल्लीतील जाफराबाद, चांद बाग, गोकुळपुरी, शिवविहार व आजूबाजूच्या भागांमधील घरांमध्ये पेट्रोल बॉम्ब, अॅसिडने भरलेल्या बाटल्या, दगड, शस्त्रे आदींचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता.
विविध भागांतील लोकांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार घडवावा याची जबाबदारी दानिश याच्यावर सोपविण्यात आली होती. महिला व मुलांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनजवळचे सर्व रस्ते २३ फेब्रुवारी रोजी रोखले होते. तोही पूर्वनियोजित कटाचाच भाग होता, असे उमर खालिदविरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.