Delhi Riots: पोलिसांच्या आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांच्यासह बड्या नावांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 11:00 PM2020-09-12T23:00:05+5:302020-09-12T23:02:40+5:30
Delhi Riots: आंदोलकांना कोणत्याही थराला जाण्याची चिथावणी दिल्याचा ठपका
नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र तयार केलं आहे. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कार्यकर्ते अपूर्वानंद आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकर राहुल रॉय यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. कटकारस्थानासह सहाय्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरी नक्षलवादाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
कोणत्याही थराला जा, अशी चिथावणी आरोपींनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांना दिली होती. आरोपींनी सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी मुस्लिमविरोधी असल्याचं सांगत आरोपींनी आंदोलनकर्त्यांच्या मनात नाराजी निर्माण केली. त्यांनी भारत सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी आंदोलनांचं आयोजन केलं, असा तपशील पुरवणी आरोपपत्रात आहे.
जेएनयू आणि जामियाचे विद्यार्थीदेखील आरोपी
दिल्लीच्या ईशान्य भागात २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला. तर ५८१ जण जखमी झाले. यातील ९७ जण गोळीबारात जखमी झाले, अशी माहिती पुरवणी आरोपपत्रात आहे. तीन विद्यार्थ्यांनी दिलेल्या जबाबांवरून पोलिसांनी प्रख्यात नेत्यांवर आरोप ठेवले आहेत. जेएनयूच्या विद्यार्थिनी देवांगना कालिता, नताशा नरवाल आणि जामिया मिलिया इस्लामियाची विद्यार्थिनी गुलफिशा फातिमा 'पिंजरा तोड'च्याही सदस्या आहेत. जाफराबाद हिंसाचार प्रकरणात त्या आरोपी आहेत.