Delhi Rohini Court: दिल्लीच्या रोहिणी कोर्टात पुन्हा गोळीबार; सुरक्षा रक्षकाने वकीलावर झाडली गोळी, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:27 AM2022-04-22T11:27:48+5:302022-04-22T11:28:10+5:30
Delhi Rohini Court: गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच कोर्टात गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी जितेंद्र गोगीची गोळ्या झाडून हत्या केली होती, तर पोलिसांच्या प्रत्युत्तरात दोन्ही हल्लेखोरही ठार झाले होते.
नवी दिल्ली: दिल्लीतील रोहिणी कोर्टात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रोहिणी कोर्टाच्या आवारात एका वकिलावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. न्यायालयाच्या बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकानेच हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या गोळीबाराचे हे गूढ उकलण्यात व्यस्त आहेत. गेल्या वर्षीही रोहिणी कोर्टात गोळीबाराची घटना घडली होती.
Delhi | Shots fired at Rohini court today
— ANI (@ANI) April 22, 2022
Police say police personnel deployed at the court premises had opened fire; No injuries reported. pic.twitter.com/O1ruwubQ5f
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी गोळीबाराची घटना रोहिणी कोर्टात घडल्याची पुष्टी केली आहे. पोलिसांना गोळीबाराच्या घटनेची माहिती पीसीआरद्वारे मिळाली. सुरक्षारक्षकाने वकिलावर गोळीबार का केला, त्यांच्यात काय झाले, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र न्यायालय परिसराजवळ झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
24 सप्टेंबरलाही रोहिणी कोर्टात गोळीबार झाला
गेल्या वर्षी 24 सप्टेंबरला याच रोहिणी कोर्टाच्या कोर्टरुम क्रमांक 207 मध्ये दोन शूटर्सनी जितेंद्र गोगी याची गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले होते. या गोळीबारात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने टिल्लूला तुरुंगातून अटक केली, तर कटात सहभागी असलेल्या उमंग यादवला हैदरपूर येथून अटक करण्यात आली.