मुलीच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नाहीत; कर्ज घेऊन लेकीला दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 08:41 AM2023-05-30T08:41:06+5:302023-05-30T08:43:00+5:30
दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या तरुणाने १६ वर्षीय मुलीची चाकूने ४० वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करत त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पीडितेच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती इतकी खराब आहे की मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना कर्ज घ्यावे लागले. मुलीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीला पोहचले असता तेथील कर्मचाऱ्यांनी ३५०० रुपये शुल्क आकारले परंतु तितके पैसे देणेही तिच्या कुटुंबाला शक्य नव्हते.
आई वडिलांनी हात जोडून कर्मचाऱ्यांना विनंती केली परंतु पैसे घेतल्याशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर आईवडिलांनी मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी आसपासच्या लोकांकडे मदतीची याचना केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडूनही पैसे घेतले आणि कर्मचाऱ्यांना ३ हजार रुपये दिले. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, हे ३००० आम्ही शेजारील लोक आणि नातेवाईकांकडून कर्ज म्हणून घेतले. कुटुंबात १२ वर्षाचा मुलगा आहे जो सध्या शिक्षण घेतोय. मुलीच्या हत्येनंतर कुटुंब उद्ध्वस्त झालं असा टाहो कुटुंबियांनी फोडला.
याच महिन्यात मुलीने १० वी पास केली होती. शिक्षणात साक्षी हुशार होती. तिला वकील बनण्याची इच्छा होती. तिला शिक्षणासाठी जे हवे ते देण्याचं मी ठरवले होते. माझी मुलगी आता या जगात नाही यावर माझा विश्वास बसत नाही. मुलीच्या मृतदेहाला अग्नी देताना बापाच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. माझी मुलगी कुणाच्यामध्ये नव्हती. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ती शेजारील महिलेच्या घरी गेली होती. त्या मुलासोबत माझ्या मुलीची मैत्री होती असं वाटत नाही. जर तो मित्र असता तर इतक्या क्रूरपणे तिची हत्या केली नसती असं साक्षीच्या वडिलांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या तरुणाने १६ वर्षीय मुलीची चाकूने ४० वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत एडीसीपी आऊटर-उत्तर राजा बंठिया यांनी सांगितले की, मुलगी जे.जे. जे. कॉलनीची रहिवासी आहे. ती रस्त्यावरुन चालत जात असताना आरोपीने तिला अडवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपी मुलगा आणि मुलगी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, त्याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे.