दिल्लीत उष्णतेमुळे एका आठवड्याने वाढवली शाळांची उन्हाळी सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 04:57 PM2019-06-30T16:57:20+5:302019-06-30T17:27:20+5:30
राजधानी दिल्लीतील तापमानाने तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उष्णता वाढल्याने 8 वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे.
नवी दिल्ली - मान्सूनपूर्व पावसाला उशीर झाल्याने देशातील अनेक शहरांमधील तापमान वाढले आहे. राजधानी दिल्लीतीलतापमानाने तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उष्णता वाढल्याने 8 वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
दिल्लीमध्ये उष्णतेची लाट असून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली आहे. दिल्लीतील शाळा आता 8 जुलैपासून सुरू होणार आहेत. तर नववी आणि दहावीचे वर्ग नियोजित वेळेत सुरू होणार आहेत. हा आदेश खासगी शाळांना देखील लागू असेल असे सिसोदिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Classes till std 8 in all schools of Delhi, both govt and private, to reopen on 8 July as their summer vacation has been extended due to the rising temperature in the national capital. Classes for std 9-12 will resume as per the schedule. pic.twitter.com/fqXZeiZydT
— ANI (@ANI) June 30, 2019
दिल्लीमध्ये 10 जून रोजी 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेल्याची माहिती स्कायमेटने दिली होती. हवामान खात्याने पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन लांबल्याने तापमान वाढले आहे. उष्ण वारे वाहत असल्याने दिल्लीकर मेटाकुटीला आले आहेत.
दिल्लीच्या पालममध्ये 9 जून 2014 रोजी 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. दिल्लीत सकाळी कडक ऊन पडतं. त्यानंतर दुपारी उष्ण वारे वाहू लागलात. दिल्लीत पारा 50 अंशांच्या आसपास पोहोचला असताना राजस्थानमध्ये तापमानाने पन्नाशी पार केली आहे. चुरू भागात पाऱ्यानं पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत.