८ किमीसाठी मिळाले फक्त इतके पैसे; कॉलेजची फी भरण्यासाठी करतो काम, डिलिव्हरी बॉयची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:08 IST2025-02-25T13:06:06+5:302025-02-25T13:08:00+5:30
विद्यार्थ्याने सांगितलं की तो त्याच्या कॉलेजची फी भरण्यासाठी स्विगीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.

८ किमीसाठी मिळाले फक्त इतके पैसे; कॉलेजची फी भरण्यासाठी करतो काम, डिलिव्हरी बॉयची व्यथा
दिल्लीत राहणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थ्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. विद्यार्थ्याची एक रेडिट पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये विद्यार्थ्याने सांगितलं की तो त्याच्या कॉलेजची फी भरण्यासाठी स्विगीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याने रेडिटवर 'आस्क-मी-एनीथिंग' असं सेशन आयोजित केलं होतं, ज्यामध्ये युजर्सनी त्याला टिप्स आणि त्याचे सर्वोत्तम आणि सर्वात वाईट अनुभव विचारले.
एका उत्तरात विद्यार्थ्याने सांगितलं की, तो पार्ट टाईम काम करून दरमहा ६,००० ते ८,००० रुपये कमवतो. त्याने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवरून असं दिसून आलं की १७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान फक्त चार तास ४६ मिनिटे काम करून त्या विद्यार्थ्याने ७२२ रुपये कमावले. १०-१६ फेब्रुवारीच्या आठवड्यात १० तासांपेक्षा थोडे जास्त काम करून त्याने १,९९० रुपये कमावले. त्यानंतर ३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात १९.५ तासांपेक्षा जास्त काम करून त्याने ३,११७ रुपये कमावले आणि २७ जानेवारीपासून चार आठवड्यात ७,२०० रुपये पेक्षा जास्त कमावले. तो दररोज पेट्रोलवर सुमारे ₹१००-१५० खर्च करतो.
विद्यार्थ्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि दाखवलं की त्याला २८ मिनिटांत ८.४ किलोमीटरसाठी फक्त २३ रुपये मिळाले. यामध्ये १० रुपये 'प्रवासाचा खर्च' आणि १३ रुपये 'सर्ज बोनस' समाविष्ट होता. कामाच्या ठिकाणी आलेला एक वाईट अनुभव सांगताना, विद्यार्थ्याने सांगितलं की ऑर्डर देण्यास उशीर झाल्यामुळे एका ग्राहकाने त्याला मारहाण करण्याची धमकी दिली होती. मुलाने सांगितलं की त्याला उशीर झाला कारण रात्र होती आणि ग्रीन पार्क परिसरातील त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगल मॅप्सने दाखवलेले मार्ग बंद होते.
एका हृदयस्पर्शी आठवणीबद्दल बोलताना, मुलाने सांगितले की एकदा त्याने रुग्णालयात ७-१० वर्षांच्या मुलीला मिठाई दिली, ती आनंदाने नाचू लागली. मुलीने त्याला सांगितलं की तिच्या आईने नुकताच तिच्या भावाला जन्म दिला आहे आणि तिने त्याला १०० रुपयांची टीप देखील दिली होती. त्याने स्विगीसोबत पार्ट टाईम काम करायला सुरुवात केली कारण शॅडोफॅक्ससाठी वस्तू पोहोचवणाऱ्या एका व्यक्तीला पाहून त्याला उत्सुकता निर्माण झाली. सुरुवातीला काम करण्याचा माझा एकमेव उद्देश हा पॉकेट मनी कमावणे हाच होता. पण नंतर मी माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी काम करू लागलो.