३ पोलीस ठाणे, १२ किमीचा रस्ता आणि ९ PCR व्हॅन...तरीही तरुणीला फरफटत नेताना पोलिसांना दिसलं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:53 PM2023-01-03T20:53:46+5:302023-01-03T20:55:51+5:30
दिल्लीच्या सुल्तानपुरी ते कांझावलाच्या दरम्यान खडकाळ रस्ता आहे. याच रस्त्यावर फरफटत नेल्यामुळे एका २० वर्षाच्या तरुणीला असह्य वेदना सहन करत मृत्यूला सामोरं जावं लागलं.
नवी दिल्ली-
दिल्लीच्या सुल्तानपुरी ते कांझावलाच्या दरम्यान खडकाळ रस्ता आहे. याच रस्त्यावर फरफटत नेल्यामुळे एका २० वर्षाच्या तरुणीला असह्य वेदना सहन करत मृत्यूला सामोरं जावं लागलं. दिल्लीत नववर्ष स्वागताच्या रात्री पार्टीच्या धुंदीत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या पाच तरुणांनी एका तरुणीला धडक दिली आणि तब्बल १२ किमी फरफटत नेलं. यात तिचा मृत्यू झाला.
१२ किमीच्या रस्त्यात तीन पोलीस ठाणे आहेत. तर ९ पीसीआर व्हॅन आहेत आणि दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त सुरू असते असा दावा पोलिसांकडून केला जातो. मग भर रस्त्यात तब्बल १२ किमी दूरवर एका तरुणीला कारमधून भरधाव वेगात जाणाऱ्या पाच जणांनी फरफटत नेलं. यात तरुणीचा कधी मृत्यू झाला हेही कळलं नाही. घटना इतकी भयंकर आहे की इतक्या दूरवर तिला फरफटत नेल्यामुळे तरुणीच्या शरीरावर एकही कपडा शिल्लक राहिला नाही. तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत दुसऱ्या दिवशी सकाळी आढळून आला. १२ किमीच्या रस्त्यात ३ पोलीस ठाण्यापैकी कुणीच ही घटना पाहिली नाही किंवा गस्तीवर असणाऱ्या ९ पोलीस व्हॅनलाही या घटनेचा मागमूस नाही.
फक्त एका व्यक्तीनं दाखवली हिंमत
दिल्ली पोलिसांचं गस्ती पथक तिला पाहू शकलं नाही किंवा ती कारही त्यांना दिसू शकली नाही. पण दीपक नावाच्या तरुणानं मात्र माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं. बलेनो कारच्या मागे एक तरुणी अडकली असून तिला फरफटत नेलं जात असल्याचं त्यानं पाहिलं. दीपकनं जवळपास दोन तास त्या कारचा पाठलाग केला. दीपकमुळेच संपूर्ण घटनेची माहिती मिळाली नाहीतर पोलीस या दुर्घटनेला एक सर्वसाधारण अपघात म्हणून नोंद करुन मोकळे झाले होते.
पोलिसांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसामधील डीसीपी यांच्याकडून या घटनेबाबत एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. "एक जानेवारीच्या मध्यरात्री ३ वाजून २४ मिनिटांनी एका व्यक्तीनं पीसीआरमध्ये फोन केला. एक बलेनो कार जी कुतुबगडच्या दिशेनं जात असून कारला एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आहे. फरफटत नेलं जात आहे, असं फोनवर सांगण्यात आलं होतं", अशी माहिती डीसीपींनी दिली.