दिल्लीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून फटाकेबाजी, स्थिती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:46 AM2017-10-21T03:46:16+5:302017-10-21T03:46:21+5:30
दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे.
प्रदूषणाचा स्तर दर्शविणा-या सरकारी ‘सफर’(सिस्टिम आॅफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च) या यंत्रणेचे चिन्ह गडद बनले आहे. सदृढ आरोग्य असणा-यांवरही परिणाम करणारे असे हे प्रदूषण असून श्वसन आणि हृदयासंबंधी आजारी लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
दिल्लीत गेल्या २४ तासात पीएम २.५ आणि पीएम १० ची सरासरी अनुक्रमे ४२४ आणि ५७१ मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर असून सुरक्षित मर्यादेपेक्षा त्याचे प्रमाण अनुक्रमे ६० ते १०० पट जास्त होते. अमेरिकेच्या दूतावासातील प्रदूषण निगराणी केंद्राने वायूच्या गुणवत्तेचा निर्देशांक ८७८ एवढा निश्चित केला असून तो अतिशय धोकादायक मानला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावेळी दिवाळीच्या काळातील वातावरण अधिक स्वच्छ होते. दिल्लीची संध्याकाळ शांत होती. दिल्लीच्या एनसीआर भागात सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या विक्रीवर आणलेल्या बंंदीचा तो प्रभाव असावा, असे मानले जात होते, मात्र त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि कर्णकर्कश आवाजाची भर पडत गेली. पहाटेपर्यंत हा धडाका सुरू होता. सफर या यंत्रणेने लावलेल्या अंदाजानुसार दिल्लीतील वातावरण गेल्यावर्षी एवढे प्रदूषित नसले तरी दर्जा धोकादायक स्थितीपर्यंत खालावला आहे. तीन दशकांमध्ये गेल्यावर्षी सर्वात वाईट प्रदूषणाची नोंद झाली होती. गुडगाव, नोएडा, गाझियाबादमध्ये नेहमीप्रमाणे फटाके फुटले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणाºया प्रशासकीय यंत्रणा निष्प्रभ ठरली. (वृत्तसंस्था)
आगीच्या २०४ घटना, गोदाम जळून खाक...
दिवाळीत फटाके फुटत असताना आगीच्या २०४ घटनांबाबत अग्निशमन केंद्राला फोन कॉल आले. त्यापैकी ५१ घटना फटाक्यांमुळे लागलेल्या आगीसंबंधी होत्या. पूर्व दिल्लीतील सुभाष मोहल्ल्यात भीषण आग लागून कापडाचे गोदाम खाक झाले. २६ बंबांनी ती आटोक्यात आणण्यात आली. १८ आॅक्टोबरची मध्यरात्र ते दिवाळीच्या मध्यरात्रीपर्यंत आगीच्या घटनांसंबंधी २०४ कॉल आल्याची माहिती दिल्ली अग्निशमन सेवेच्या(डीएफएस) अधिका-याने दिली.