Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 09:17 AM2024-06-08T09:17:13+5:302024-06-08T09:24:09+5:30
दिल्लीत कडाक्याच्या उन्हात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नरेला परिसरातील भोरगड इंडस्ट्रीयल एरियामध्ये अशीच घटना घडली आहे. फूड फॅक्ट्रीला लागलेल्या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे
देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याच्या उन्हात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नरेला परिसरातील भोरगड इंडस्ट्रीयल एरियामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथील फूड फॅक्ट्रीला लागलेल्या भीषण आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या फूड फॅक्ट्रीमध्ये पहाटे ३ वाजता बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयातून मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. नरेला येथील फूड फॅक्ट्रीत आग लागल्याची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आज पहाटे ३:३५ वाजता पीएस एनआयएला पीसीआर कॉल आला.
#WATCH | Delhi | Three people died, six injured in a fire that broke out in a factory in Narela Industrial Area. Upon preliminary investigation it was revealed that raw moong was roasted on gas burners and a gas leak on one of the pipelines caused the fire to spread which led to… pic.twitter.com/vQoNvlq2y7
— ANI (@ANI) June 8, 2024
फूड फॅक्ट्रीत आग लागली आहे. मात्र यामध्ये कोणी अडकलं आहे का याबाबत नेमकी माहिती नाही असं कॉलमध्ये सांगण्यात आलं. यानंतर तातडीने तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता असं आढळून आले की, मूग डाळ बनवणाऱ्या फॅक्ट्रीला आग लागली असून काही लोक आतमध्ये अडकले आहेत.
अग्निशमन विभागाच्या मदतीने एकूण नऊ जणांना वाचवण्यात आले आणि त्यांना नरेला येथील एसएचआरसी रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी तिघांचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर भाजले जात असल्याचं समोर आलं आहे. गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली, ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.