वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी खुशखबर; दिल्ली-कटरा प्रवास फक्त सहा तासांत होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:45 AM2023-04-11T11:45:03+5:302023-04-11T11:46:11+5:30
सध्या हा प्रवास करण्यासाठी 10 ते 12 तास लागतात.
नवी दिल्ली : तुम्हीही सतत वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने अनेक गाड्या सुरू केल्या आहेत. आता रस्त्याने कटरा येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली ते कटरा हा रस्ता मार्गाने फक्त सहा तासांचा असणार आहे. सध्या हा प्रवास करण्यासाठी 10 ते 12 तास लागतात.
दिल्ली-अमृतसर-कटरा ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून तयार केला जात आहे. या एक्स्प्रेस वेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. यानंतर तुम्ही अतिरिक्त वेळ न घेता रस्ते आणि रेल्वेने कटरा वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचू शकता. 670 किमी लांबीचा दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वे (Delhi-Amritsar-Katra Expressway) 37,524 कोटी रुपये खर्च करून बांधला जात आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या एक्स्प्रेस वेबाबत घोषणा केली होती. नव्या एक्स्प्रेस वेच्या निर्मितीमुळे दिल्ली ते कटरा हे अंतरही कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत नितीन गडकरींनीजम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची प्रगती पाहिली होती. सध्या तुम्ही दिल्लीहून वैष्णोदेवीला रस्त्याने गेलात तर तुम्हाला किमान 12 तास लागतात. याशिवाय, दिल्ली ते अमृतसर या 405 किमीच्या प्रवासाला आठ तास लागतात. मात्र एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर अमृतसरपर्यंतचे अंतर चार तासांत कापले जाणार आहे.
याचबरोबर, दिल्लीहून कटरा सहा तासांत पोहोचेल. या एक्स्प्रेस वेवरून आठ तासांत श्रीनगरला पोहोचता येते. दिल्ली-कटरा द्रुतगती मार्गावर फूड कोर्ट, ट्रॉमा सेंटर, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिस स्टेशनची सुविधा असणार आहे. डिसेंबरपासून हा एक्स्प्रेस वे हरयाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून जाईल. हा सुरू झाल्यानंतर दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधून येणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.