दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; वाजपेयींच्या नावानंही असणार सेंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:38 PM2021-08-27T23:38:10+5:302021-08-27T23:39:57+5:30
दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
नवी दिल्ली- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्य नावाणे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मंजुरीही दिली आहे. याच बरोबर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या नावाने महाविदयालय-सेंटर्स असणार आहेत. (Delhi university clears proposal to name new college after savarkar vc justifies the move)
दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
या नेत्यांच्या नावानेही असतील महाविद्यालय-सेंटर्स -
शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत ज्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यांत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री ब्रह्म प्रकाश आदी नावांचाही समावेश आहे.
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर पी. सी. जोशी यांनी एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले, की ज्या नावांना मंजुरी मिळाली आहे, ती नावे समाजातील त्यांच्या योगदानाच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच, विहित प्रक्रियेचे पालन करूनच, परिषदेने या नावांना मंजुरी दिली आहे.
दिल्लीत दोन नवी महाविद्यालये -
दिल्लीत दोन नवी महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. पहिले महाविद्यालय दक्षिण दिल्लीतील भाटी गावात, तर दुसरे महाविद्यालय दिल्लीतील नजफगड गावाजवळील रौशनपुरा येथे उभारण्यात येईल. या दोन महाविद्यालयांशिवाय चार सुविधा केंद्रांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. या चार सुविधा केंद्रांपैकी दोन, या दोन्ही महाविद्यालयांच्या परिसरात सुरू करण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित दोन शाहबाद डेअरी आणि पूर्व दिल्ली क्षेत्रात सुरू केली जाणार आहेत. तसेच येथे एक नवीन लॉ कॅम्पसही सुरू करण्याचा विचार आहे.
सावरकर स्वातंत्र्य सेनानी होते -
प्रो. पी. सी. जोशी यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हणत, सावरकर हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमान येथे आजही सेल्यूलर जेल आहे, जेथे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. अंदमान येथे गेलो असता, त्या सेल्यूलर जेलला भेट दिली होती. तेव्हा स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे जाणवले, असे प्रो. जोशी यांनी नमूद केले. तसेच, या स्वातंत्र्यसंग्रामात सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचेही योगदान तितकेच मोठे आणि महत्त्वाचे आहे, असेही प्रो. जोशी यांनी म्हटले आहे. ही नावे एक्झिक्यूटिव्ह काउंसीलसमोर अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्ली विद्यापीठातील अनेकांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या एक्झिक्यूटिव्ह काउंसिलचे माजी सदस्य राजेश झा यांनी म्हटले आहे, की विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक परिषदेला अंधारात ठेऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही याला विरोध करू.