भाजपाला मतदान करु नका; दिल्ली विद्यापीठातील शिक्षकांचे कर्नाटकातील मतदारांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 11:34 AM2018-05-11T11:34:02+5:302018-05-11T11:59:35+5:30
दिल्ली विद्यापीठातील काही शिक्षकांनी कर्नाटकातील मतदारांना सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली- कर्नाटकात उद्या १२ मे रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यासाठी प्रचारही काल संध्याकाळी थांबवण्यात आला. मात्र दिल्ली विद्यापीठातील काही शिक्षकांनी केलेल्या आवाहनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीपासून शेकडो किमी दूर असणाऱ्या कर्नाटकातील मतदारांना त्यांनी भाजपाला मतदान करु नका असे आवाहन केले आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने अनुसुचित जाती, जमातींच्या प्रतिनिधींच्या नेमणुका रोखण्यासाठी, शिक्षणाचे खासगीकरण करण्यासाठी आणि प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रोसिटीज कायद्याला निष्प्रभ करण्यासाठी पावले उचलली आहेत त्यामुळे त्यांना म्हणजेच भाजपाला मतदान करु नका असे आवाहन या शिक्षकांनी केले आहे. मोदी सरकारने नोकरभरती रोखून तरुणांना अनियंत्रित अशा धार्मिक उन्माद व जातीय तणावांकडे ढकलले आहे असा आरोपही या शिक्षकांनी केला आहे.
मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष बी. पी मंडल यांचे नातू मंडल हे स्वामी श्रद्धानंद महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी केलेल्या आवाहनात, आम्ही कर्नाटकातील दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्यांक समुदायाला भाजपाच्या सामाजिक अन्यायाचा पराभव करा असे आवाहन करतो असे म्हटले आहे.