दिल्ली विद्यापीठाच्या माजी प्राध्यापकाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक
By admin | Published: February 16, 2016 09:14 AM2016-02-16T09:14:58+5:302016-02-16T09:21:47+5:30
दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक एसएआर गिलानीला देशद्रोह आणि अन्य आरोपांखाली मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक एसएआर गिलानीला देशद्रोह आणि अन्य आरोपांखाली मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. गिलानी सहभागी झालेल्या एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी गिलानीला अटक करण्यात आली आहे.
कलम १२४ अ देशद्रोह, १२० ब गुन्हेगारी कट रचण आणि कलम १४९ या कलमांखाली गिलनीला आज पहाटे तीनच्या सुमारास पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्थानकात अटक करण्यात आली. सोमवारी रात्री गिलानीला पोलिस स्थानकात बोलवण्यात आले होते. तिथे त्याला ताब्यात घेऊन काही तास चौकशी करण्यात आली. नंतर त्याला अटक करण्यात आली.
अटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी त्याला आरएमएल रुग्णालयात नेण्यात आले. १० फेब्रुवारीला प्रेस क्लबमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गिलानी अन्य तीन वक्त्यांबरोबर मंचावर होता. त्यावेळी एक समूह अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होता.
१२ फेब्रुवारीला पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणी गिलानी आणि अन्य तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. गिलानी या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक असल्याने त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गिलानीला २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ला प्रकरणात अटक झाली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्टोंबर २००३ मध्ये त्याची सुटका केली होती. ऑगस्ट २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवला होता.