ज्ञानवापी-शिवलिंगवरील वादग्रस्त पोस्ट, दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 02:22 PM2022-05-21T14:22:17+5:302022-05-21T14:24:43+5:30
प्राध्यापक रतनलाल यांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.
नवी दिल्ली - दिल्ली युनिव्हर्सिटीचे हिंदू कॉलेजचे प्राध्यापक रतनलाल यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्यांनी ज्ञानव्यापी मस्जिदवरील शिवलिंग प्रकरणात केलेल्या टिपण्णामुळे त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. देशात सध्या ज्ञानव्यापी मस्जिदवर शिवलिंग असल्याचा दावा करत वाद निर्माण झाला आहे. त्यावरुन, अनेकजण आपली मतं मांडत आहेत. दरम्यान, प्राध्यापक रतनलाल यांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.
रतनलाल यांच्यावर इंडियन पीनल कोड म्हणजे भादंवि 153A (धर्म, जाति, जन्मस्थळ, निवास, भाषा इत्यादीच्या आधारावर दोन समुदायांत तेढ वाढविण्यास आणि शांति भंग करण्याच्या उद्देशाने कार्य केल्याचा आरोप) आणि 295A (कुठल्याही समुदायाच्या धर्माचा अपमान करुन धार्मिक भावनांना जाणीवपूर्वक ठेस पोहचविणे) च्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रतनलाल यांच्या अटकेनंतर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि एआयएसएने विरोध करत निदर्शने केली आहेत. दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली नॉर्थ डिस्ट्रीक्टच्या सायबर पोलीस ठाण्यात जाणाऱ्या रस्त्याला ब्लॉक केलं आहे.
Students' Federation of India (SFI) & All India Students Association (AISA) protest & block the road outside Cyber PS, North District, over the arrest of Ratan Lal, History Prof at Hindu College, DU, regarding a social media post allegedly intended to outrage religious beliefs. pic.twitter.com/SByZwCwrEW
— ANI (@ANI) May 20, 2022
दरम्यान, रतनलाल यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप वकील महमूद प्राचा यांनी केला आहे. एफआयआरमध्ये अशी कुठलिही बाब नाही, जी या गंभीर गुन्ह्यात नमूद आहे. तसेच, भादंवि 153 A आणि 295 A नुसार अटक करण्यात येत नाही. पोलिसांकडे तो अधिकार नाही, त्यामुळे ही अटक न्यायालयाचा अवमान असल्याचेही वकील प्राचा यांनी म्हटले आहे.