Delhi Violence: आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू; हिंसाचार करणाऱ्यांना दिसता क्षणीच गोळी घालण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 04:32 AM2020-02-26T04:32:33+5:302020-02-26T06:54:17+5:30
ईशान्य दिल्लीत संचारबंदी; दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
नवी दिल्ली : दोन महिन्यांपासून शांततेने सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनास देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात एका पोलिसासह १३ जणांचा बळी घेतला आहे. शिवाय ६७ पोलिसांसह १५० हून अधिक दिल्लीकर जखमी झाले आहेत. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.
भजनपुरा आणि खजुरी खसमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने पोलिसांनी या भागात संचलन केले. दिल्लीतील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांना सीआरपीएफमधून माघारी बोलावून दिल्लीचे
विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) म्हणून तत्काळ नियुक्त केले. दिल्ली पोलिसांनी रात्रीपर्यंत ११ एफआयआर दाखल करत
वीसहून अधिक लोकांना अटक केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात असतानाच हिंसाचार उसळल्याने गृह विभागाने यामागे कट असल्याचाही संशय व्यक्त
केला. ईशान्य दिल्लीत रविवारी रात्रीपासून कायद्याचे समर्थक व विरोधकांमध्ये संघर्ष पेटला. सोमवारी हिंसाचाराने हेड कॉन्स्टेबल रतन
लाल यांचा बळी घेतला. त्यानंतर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल बैठकीत उपस्थित होते.
गृहमंत्र्यांच्या बैठकीत दिल्लीकरांना शांततेचे आवाहन करण्यात आले. केजरीवाल यांनीही आप आमदारांची बैठक बोलावली. मंगळवारी दिवसभराच्या जाळपोळीच्या घटनाक्रमानंतर एक हजारांपेक्षा जास्त सशस्त्र पोलिसांनी संपूर्ण ईशान्य दिल्लीचा ताबा घेतला.
पोलिसांच्या संख्येअभावी हिंसेत वाढ
पोलिसांची संख्या कमी असल्यामुळेच हिंसाचार भडकल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाला दिली. त्यामुळेच हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांनी उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
शांततेचे प्रयत्न सुरू
अमित शहा यांनी दिल्ली सरकारला सहकार्याचे आश्वासन दिले. बैठक सकारात्मक ठरली, असे केजरीवाल म्हणाले. राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेत केजरीवाल यांनी शांततेचे आवाहन केले.
दिल्लीत बाहेरून येणाºयांना रोखायला हवे, असे सूचक विधान केजरीवाल यांनी केले. संशयितांना अटक करायला हवी, असेही ते म्हणाले. त्यानंतर दिल्लीच्या सर्व सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिंसाचारप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्लाह यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.
दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलीस तैनात
दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.