Delhi violence: घरमालकाने बाहेर काढले; जमावाने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 02:16 AM2020-02-28T02:16:39+5:302020-02-28T02:17:05+5:30
डोक्याला गंभीर इजा; मूळच्या उत्तर प्रदेशातील जखमी आसीफला अश्रू अनावर
नवी दिल्ली : चोहोबाजूने हिंसा सुरू असताना घरमालकाने हाकलून दिल्यामुळे जमावाच्या तावडीत सापडलो आणि दहा-बारा जणांकडून बेदम मारहाण सुरू झाली. हे सांगताना ईशान्य दिल्लीतील २० वर्षीय मोहम्मद आसीफ याला अश्रू अनावर झाले होते. मूळचा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा आसीफ गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
हिंसाचारामुळे मंगळवारी सकाळीत घरमालकाने आसीफला घराबाहेर काढले. मालकाने घराबाहेर काढताच जमाव माझ्यावर तुटून पडला. घरमालकाने हाकलल्यानंतर लपण्यासाठी माझ्याकडे जागा नव्हती, असे आसीफने सांगितले. त्याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करण्यात आले असून, त्याच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आसीफच्या पायाला व हातालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. आसीफने आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली असून त्याचे कुटुंबीय त्याला गावी घेऊन जाणार आहेत. आसीफ हा शिंप्याच्या दुकानात नोकरीला होता.
जखमींवर जीटीबी आणि लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीटीबी रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, विच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात येत आहेत. जखमींपैकी अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका २० वर्षीय युवकाच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या डोक्यात लोखंडी गज घुसला होता. गज काढल्यानंतर रुग्ण शुद्धीवर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची किंचितशीही धग विजय पार्क व यमुना विहार परिसराला लागली नाही. याठिकाणी अनोखी हिंदू-मुस्लिम एकता असल्याने साऱ्यांनीच बंधुभाव जपला. त्यामुळेच आजही सारे जण गुण्यागोविंदाने तेथे राहत आहेत.
विजय पार्क आणि यमुना विहारमधील रहिवाशांनी कुणालाही घुसू दिले नाही. त्यामुळेच रस्त्याच्या एका बाजूला घरांचे नुकसान झाले; पण दुसºया बाजूला नुकसान झाले नाही.
येथे विविध धर्मांचे लोक राहतात. येथे मंदिर व मशीद यांच्यातील अंतर अवघे १०० मीटर एवढे आहे. सायंकाळी मशिदीमध्ये नमाज पढला जातो, तर मंदिरात आरती होते. मात्र, त्याचा कुठलाही त्रास झाल्याची तक्रार आजवर कुणी केली नाही.