Delhi Violence: शरीरावर चाकूचे शेकडो वार करून अंकित शर्माला संपवले, पोस्टमार्टेममधून झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 12:27 PM2020-02-28T12:27:52+5:302020-02-28T12:29:52+5:30
Delhi Violence News : अंकित शर्मा यांच्या पोस्टमार्टेम अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान झालेल्या क्रौर्याची एकेक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. सीएए-एनआरसीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे यांच्यात उसळलेल्या या दंगलीत इंटेलिजेंस ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांचा हकनाक बळी गेला होता. आता अंकित शर्मा यांच्या पोस्टमार्टेम अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. चाकूने शेकडोवेळा भोसकून अंकित शर्मा यांचा जीव घेण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यांची छाती आणि पोटावर चाकूचे असंख्य वार दिसून आले आहेत.
आयबीचे कर्मचारी असलेल्या अंकित शर्मा यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे पोस्टमार्टेम अहवालातून समोर आले आहे. अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचा अनेक खुणा आहेत. त्यात पोट आणि छातीवर सर्वाधिक वार करण्यात आले. दरम्यान, अंकित शर्मा यांच्या वडिलांनी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणी भादंवि कलम ३०२, २०१, ३६५, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नमूक केल्याप्रमाणे अंकित हा त्यांचा छोटा मुलगा होता. भजनपुरा येथून करावलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीएएविरोधात अनेक दिवासांपासून आंदोलन सुरू होते. यादरम्यान, जमावाकडून दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबारासारख्या घटनाही झाल्या होत्या.
अंकित शर्मा यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहीर हुसेन यांचे नावही आहे. ताहीर हुसेन यांनी आपल्या घरात गुंडांना आश्रय दिला होता. तसेच त्यांच्या कार्यालयावरून गोळीबार केला गेला. पेट्रोल बॉम्ब फेकले गेले. २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अंकित सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. बराच वेळ तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. असे अंकित यांच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित बातम्या
Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती
Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य
Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?'
दरम्यान, ईशान्य दिल्लीत गुरुवारी पूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तिथे तणाव असून, दुकाने, बाजारपेठा, शाळा, बँका बंदच आहेत. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असून, जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.