Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:34 AM2020-02-25T10:34:47+5:302020-02-25T10:44:40+5:30
Delhi Violence: जवळपास १५ मिनिटानंतर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. यादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
नवी दिल्ली - सीएएविरोधातील आंदोलनातून दिल्लीत हिंसाचार पेटला आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये परिस्थिी नियंत्रणाबाहेर गेली असून लोकांना तुम्ही हिंदू आहे की मुस्लीम? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. धार्मिक आधारावर मारहाण, हिंसाचार पेटवला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार दिल्लीतील हिंसाचारादरम्यान घडला.
टाइम्स ऑफ इंडियाचा फोटोग्राफर ज्यावेळी मौजपूर मेट्रो स्टेशनला पोहचला, त्यावेळी एक हिंदू सेनेचा सदस्य त्यांच्याजवळ येऊन फोटोग्राफरच्या कपाळावर टिळा लावला. आता तुमचं काम सोप्प होईल, तुम्ही हिंदू आहात मग याने काय नुकसान होणार असं त्या व्यक्तीने फोटोग्राफरला सांगितले. जवळपास १५ मिनिटानंतर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. यादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. फोटोग्राफर आग लागलेल्या ठिकाणी जायला लागला त्यावेळी त्याला काही लोकांनी शिवमंदिराजवळ थांबवलं. मी फोटो घेण्यास जात आहे असं सांगितल्यानंतरही त्यांनी परवानगी दिली नाही. त्यावेळी तुम्ही हिंदू आहात, कशाला पुढे जाताय? असं विचारण्यात आलं.
काही वेळानंतर फोटोग्राफर बॅरिकेड्सच्या दिशेने गेला, त्यावेळी फोटो घेताना हातात बांबू आणि रॉड घेऊन आलेल्या लोकांनी त्यांना घेरलं. त्यांच्याकडून कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्या रिपोर्टर साक्षी चांदने आरडाओरड सुरु केल्यानंतर ते लोक निघून गेले. पण यातील काही लोकांनी फोटोग्राफरचा पाठलाग केला. एका युवकाने त्यांना धमकावले की, तू जास्त उडू नको, तू हिंदू आहे की मुसलमान? इतकचं नाही तर धर्म जाणून घेण्यासाठी त्यांनी पॅँट उतरवण्याची भाषाही वापरली. तेव्हा फोटोग्राफरने हात जोडून विनवणी करु लागल्याने त्यांनी फोटोग्राफरला सोडले.
या घटनेनंतर त्यांनी ऑफिसची गाडी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना सापडली नाही, त्यामुळे ते जाफराबादच्या दिशेने पायपीट करु लागले. त्याठिकाणी एक ऑटोरिक्षा मिळाली. ड्रायव्हर आरटीओला सोडण्यात तयार झाला. काही वेळानंतर चार लोकांना त्यांच्या ऑटोला थांबवले, ड्रायव्हर आणि फोटोग्राफरची कॉलर पकडून रिक्षाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र फोटोग्राफरने पत्रकार असल्याचं सांगितल्यानंतर त्या लोकांनी त्यांना सोडलं, अखेर ते दोघं आरटीओला सुरक्षित पोहचले. मात्र घडलेल्या प्रकारामुळे ऑटोरिक्षा ड्रायव्हर प्रचंड भयभीत झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल
'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द
किस्सा कुर्सी का; व्यासपीठावराच्या दोन खुर्च्यांमधून मोदींनी दिला मोठा संदेश
सीएएविरोधी आंदोलनात हिंसा; पोलिसासह दोघांचा मृत्यू
जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान, दिल्लीतल्या हिंसाचारावर गृहराज्यमंत्र्यांचं मोठं विधान