Delhi Violence: "आम्हाला मारू नका"; लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनकर्त्यांना पोलिसांची हात जोडून विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 06:51 AM2021-01-27T06:51:29+5:302021-01-27T06:53:16+5:30
आंदोलनामुळे दिल्लीतील सर्वच रस्ते जाम झाले होते. सामान्य वाहतुकीसाठी पोलिसांना अनेक ठिकाणी रस्ते वळवावे लागले
नवी दिल्ली - एरवी अधिकारी ऐकत नाहीत म्हणून गांधीगिरी केल्याच्या अनेक घटना ऐकिवात असतात. आज मात्र उलट झाले. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रथम शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकले नाही तेव्हा सर्व पोलीस अधिकारी रस्त्यावरच बसले. आंदोलक शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये आणि शांतता राखण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले.
अश्रुगोळे आणि लाठीचार्ज
या शेतकऱ्यांना थोपविण्यासाठी पोलिसांकडून विविध मार्ग अवलंबविण्यात आलेत. अक्षरधाम परिसरात पोलिसांनी दिल्लीत प्रवेश करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुगोळे सोडले तर मुकरबा चौकात आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. शेतकऱ्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली.
आता संसदेकडे...
- संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी संसदेला घेराव घालण्याचे नियोजन केले आहे. काहींना राजपथावर ट्रॅक्टर न्यायचे होते. अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आयटीओ आणि इंडिया गेटपर्यंत पोहचले.
- बुराडी येथे बॅरिकेड्स तोडून शेतकरी संसदेच्या दिशेने निघाले असले तरी पोलिसांनी त्यांना ठिकठिकाणी थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. आयटीओ चौकातून लालकिल्ला, इंडिया गेट आणि संसद भवनाकडे रस्ता जातो.
- या चौकात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोठ्या प्रमाणात गोळा झाले. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जखमी झाले.
- दुपारी १ ते २ च्या सुमारास दिल्लीच्या चारही दिशेने शेतकरी संसदेकडे निघाले. संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले की, आम्ही संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत आहोत. बुराडीहून संसदेकडे निघालो असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Two vehicles of Delhi Police including a riot control vehicle were vandalised by protesters at Nangloi-Najafgarh Road earlier today. (Video source - Delhi Police) pic.twitter.com/FWW6Detxpw
— ANI (@ANI) January 26, 2021
दिल्लीत वाहतुकीवर परिणाम
आंदोलनामुळे दिल्लीतील सर्वच रस्ते जाम झाले होते. सामान्य वाहतुकीसाठी पोलिसांना अनेक ठिकाणी रस्ते वळवावे लागले. वजिराबाद रोड, आयएसबीटी रोड, जीटी विकास मार्ग, अक्षरधाम, बुराडी आदी मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी लोकांना या मार्गावरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
#WATCH | Delhi: Protestors attacked Police at Red Fort, earlier today. #FarmersProtestpic.twitter.com/LRut8z5KSC
— ANI (@ANI) January 26, 2021
हिंसक आंदोलनात ८६ पोलीस जखमी
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन केले. त्यांनी ठिकठिकाणी केलेली दगडफेक आणि हाणामारीत ८६ पोलीस जखमी झाल्याचे दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी वेळेच्या आधीच ट्रॅक्टर रॅली काढून हिंसक पवित्रा घेतला.
इंटरनेट सेवा खंडित
शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळत असल्याने पोलिसांनी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर येथील इंटरनेट सेवा दुपारी बारापासून रात्री बारापर्यंत खंडित केली आहे. मकरबा चौक आणि नांगलोई येथील इंटरनेट सेवासुद्धा खंडित करण्यात आली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले वाहनांचे नुकसान
शामली, बागपत, बारआऊट आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील इतर भागातील शेतकरी ट्रॅक्टर मोर्चात भाग घेण्यासाठी गाझीपूर येथे येत होते. काहींनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत आरडाओरडा केला. त्यात अनेक ट्रॅक्टरचे नुकसान केले. रस्त्यावर दगडही मोठ्या प्रमाणात पडले होते. शेतकरी नेत्यांनी आरोप केला की हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, असे दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी ईश सिंघल यांनी म्हटले. आम्ही दिलेले वचन पाळत संयम राखला, मात्र आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेला लक्ष्य बनविले, असेही ते म्हणाले.
स्टंट अंगलट आला!
चिल्ला सीमेजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर एका रांगेत उभे करा, अशी सूचना दिली तेव्हा एका उत्साही ट्रॅक्टर चालकाने स्टंट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो ट्रॅक्टर उलटला. सुदैवाने चालक बचावला.