Delhi Violence: दिल्ली हिंसाचारातील पीडित बेघर मुस्लीम कुटुंबीयांना दिला हिंदू परिवाराने आसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 10:30 AM2020-02-27T10:30:22+5:302020-02-27T14:47:55+5:30
Delhi Violence News: अशोक नगर भागात घुसलेल्या एक हजाराच्या जमावाने मुस्लीम कुटुंबाच्या घरातील सामान लुटून जाळपोळ केली.
नवी दिल्ली - सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आतापर्यंत २७ हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होत आहे.
मात्र दिल्लीतील अशोक नगर भागात अनेक मुस्लिमांना हिंदू शेजाऱ्यांनी राहण्यासाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला आहे. घटनेच्या दिवशी दुपारी १ वाजता जवळपास १ हजार लोकांचा जमाव बडी मशिदीजवळ कॉलनी घुसला. त्यावेळी याठिकाणी मशिदीत २० जण नमाज अदा करत होते. मी मशिदीत होतो तेव्हा अचानक लोकांचा मोठा जमाव घुसला आणि जोरदार घोषणा देऊ लागला. आम्ही आपला जीव वाचवण्यासाठी पळत गेलो असं येथे असणाऱ्या खुर्शीर आलम यांनी सांगितले. काही जण आमच्या घराबाहेर उभे होते. हल्लेखोरांनी ६ जणांना जाळले, जमावाने मशिदीची तोडफोड करुन पेटवून दिली.
टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाला स्थानिक रहिवाशी मोहम्मद तैयब यांनी सांगितले की, जमाव दुपारी दीडच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर पोहचले याठिकाणी त्यांनी तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला. स्थानिक जमावाला कोणत्याही मालमत्तेचं नुकसान करु नका अशी विनवणी करत राहिले पण त्यांनी ऐकलं नाही. ते सर्व बाहेरचे होते, या जमावातील काही जणांकडे लोखंडी रॉड होते आणि चेहरे रुमालाने झाकले होते. त्यांनी परिसरातील दुकाने जाळण्यास सुरुवात केली. आपल्यालादेखील मारलं जाईल या भीतीने काही लोकांनी पळ काढला अशी माहिती अशोक नगर येथील रहिवासी राजेश खत्री यांनी दिली.
दुकानांना टार्गेट केल्यानंतर काही जण घरांच्या दिशेने निघाले. याठिकाणी असलेल्या ६ घरांमध्ये मुस्लीम कुटुंब राहतात. या लोकांना त्याबद्दल कल्पना असेल कारण त्यांनी इतर कोणत्याही घरांना लक्ष्य केलं नाही. घरात घुसून सर्व काही लुटले, आता आम्ही बेघर झालो आहोत असं मोहम्मद रशीद यांनी सांगितले.
आम्हाला रस्त्यावर राहण्याची वेळ आली त्यावेळी आमच्या शेजारी राहणाऱ्या हिंदू मित्रांनी आम्हाला मदत केली. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि त्यांनी आम्हाला घरात राहायला जागा दिली, सध्या आम्ही तिथेच राहत आहोत. गेल्या २५ वर्षापासून आम्ही याठिकाणी राहत आहोत पण कधीही आमच्या हिंदू शेजाऱ्यांची आमचा संघर्ष झाला नाही असं मोहम्मद रशीद म्हणाला. रशीद यांचे हिंदू शेजारी पिंटू म्हणाले की, आम्ही काहीही झालं तरी त्यांच्या पाठिशी उभं राहू, आम्हीही हिंदू आहोत. पण लोकांना आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा विचार कधीच करू शकत नाही. ज्या दुकानांना आग लागली आहे ती फक्त या कुटुंबांची होती. हिंसाचारामुळे त्यांची घरं आणि आयुष्य उद्ध्वस्त झालेत. त्यांच्या दु:खात आम्ही त्यांना एकटं सोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, हिंसाचारानंतर परिसरातील लोक एकमेकांना मदत करत होते. आम्ही कोणत्याही दंगलखोरांना ओळखले नाही. वर्षानुवर्षे जे लोक याठिकाणी शांततेत राहतात ते एकमेकांना त्रास देणार नाही. आमच्या गल्लीत दोनदा हल्ला करण्यात आला. दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता असं अशोक नगरमधील रहिवाशी नीरज कुमार यांनी सांगितले. तसेच केवळ मुस्लिमांनाच त्रास झाला नाही. तर मशिदीच्या खाली दुकान असलेल्या राजकुमार यांनाही याचा फटका बसला, जाळपोळीदरम्यान माझ्याही दुकानात लूट करण्यात आली, सगळं सामान उद्ध्वस्त केले अशी व्यथा त्यांनी मांडली.