Delhi Violence: प्रचंड राडा! शेतकरी दिल्लीत घुसले; लाल किल्ल्यावर फडकवला धर्मध्वज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 06:38 AM2021-01-27T06:38:08+5:302021-01-27T06:38:26+5:30
एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती.
विकास झाडे
नवी दिल्ली : शिस्तीने ट्रॅक्टर रॅली काढू, असे आश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि दोन महिने अगदी शांततेत असलेल्या या आंदोलनाचा त्रिफळा उडाला. सर्वच सीमांवर बॅरिकेड्स तोडत शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले. पोलिसांना अश्रुधूर, लाठीचार्ज आदींचा वापर करावा लागला, परंतु बलाढ्य संख्या असलेल्या शेतकऱ्यांपुढे तेही हतबल होते. लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी झेंडा फडकवला.
दिल्लीतील घटनेनंतर हरयाणा सरकारने आपल्या राज्यात हाय अलर्ट जारी केला आणि कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आंदोलनकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी चार एफआयआर दाखल केले आहेत. यंदाचा प्रजासत्ताक दिन तणावाच्या सावटाखाली साजरा झाला. दिल्ली येथे राजपथावर एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत असताना दुसरीकडे सुरक्षा दल आणि शेतकरी आमने-सामने उभे ठाकले होते. राजपथावर ७२ व्या गणतंत्र दिनाचा मुख्य कार्यक्रम सुरू असतानाच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांनी सकाळीच बॅरिकेड्स तोडत पूर्वनियोजित सूचनांना फाटा दिला.
एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती. तीन सीमांवरून ही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, शेतकरी आणि पोलीस यांच्यात अटी व नियम ठरले. त्यानुसार राजपथावरील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर शेतकऱ्यांच्या रॅलीला सुरुवात होणार होती. दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात करा, असे पोलिसांंनी शेतकऱ्यांना बजावले होते. परंतु तीन तास आधीच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. त्यामुळे पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आलेत. अनेक ठिकाणी दगडफेक झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला, काही ठिकाणी अश्रुधूर सोडावा लागला. सैराट वागणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या हातात तलवारी आणि लाठ्याही दिसल्यात, परंतु ज्यांच्या हातात तलवारी, लाठ्या होत्या ते शेतकरी नव्हते, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी घुसवण्यात आले, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला.