कोर्टाने JNUचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 03:09 PM2021-10-22T15:09:05+5:302021-10-22T15:09:13+5:30
शर्जील इमामला 13 डिसेंबर 2019 ला जामिया मिलिया इस्लामियामध्ये कथितरित्या आक्षेपार्ह भाषण दिल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच, 28 जानेवारी 2020 पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
नवी दिल्ली:दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)च्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान कथितरित्या आक्षेपार्ह भाषण दिल्याचा शर्जील इमामवर आरोप आहे.
यापूर्वीच्या सुनावणीत दिल्ली पोलिस म्हणाले होते की, यूएपीए अंतर्गत राजद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामने त्याच्या कथित प्रक्षोभक भाषणांद्वारे मुस्लिमांमध्ये निराशेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तर, शर्जील इमामने या प्रकरणात जामीन अर्ज दाखल करताना गेल्या सुनावणीत म्हटले होते की, त्याच्या बोलण्यामुळे हिंसा झाल्याचा कोणताही पुरावा नाही किंवा त्याने कोणालाही हिंसा करण्यास प्रवृत्त केले नाही.
'भाषणामुळे हिंसाचार झाला नाही'
जामीन अर्जात शर्जील इमामने दावा केला होता की, त्याने कोणत्याही निदर्शनादरम्यान कधीही हिंसाचारात भाग घेतला नाही. तो शांतताप्रिय नागरिक आहे. सुनावणीदरम्यान इमामचे वकील तन्वीर अहमद मीर यांनी न्यायालयात त्याच्या भाषणातील उतारे वाचले आणि ते देशद्रोहाच्या कायद्याखाली येत नाहीत, असा युक्तीवाद केला.
शर्जीलला का अटक झाली ?
13 डिसेंबर 2019 रोजी जामिया मिलिया इस्लामियामध्ये केलेल्या कथित भाषणाबद्दल शर्जील इमामला अटक करण्यात आली होती. त्याने 16 डिसेंबर रोजी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात आसाम आणि ईशान्य भारतातील भाग कापून टाकण्याची धमकी दिली होती. तो 28 जानेवारी 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहे.