Delhi Violence: गृहमंत्रालय, दिल्ली पोलिसांनी दिला संयमी वृत्तीचा परिचय; आंदोलनकर्त्यांवर शिताफीने नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 06:42 AM2021-01-27T06:42:25+5:302021-01-27T06:43:00+5:30
Farmers Protest: शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. मागील दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनांतर्गत आज ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. यामध्ये दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, सिंघू, टिकरी बॉर्डर आणि इतर ठिकाणी शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसा झाली.
केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी संयमी वृत्तीचा परिचय देत आंदोलनकर्त्यांवर शिताफीने नियंत्रण मिळवले आहे.
काहीही झाले तरी आंदोलनकर्त्यांवर गोळीबारासारखे पाऊल उचलायचे नाही, अशी स्पष्ट ताकीद दिली होती. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांवर हल्लेदेखील झाले. आंदोलनकर्त्यांपैकी काहीजण चक्क लाल किल्ल्यावर पोहोचले होते. त्यांनी तेथे शेतकरी युनियन आणि खालसा पंथाचे ध्वज फडकविले, तरीही देशात प्रजासत्ताक दिनाच्या या उत्सवी सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी गोळीबार न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.
दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनात अचानक हिंसेचा आगडोंब उसळला, हे अनेकांसाठी धक्कादायक होते. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी मात्र या हिंसक कारवायांपासून अंतर राखले. या नेत्यांनी भाजपने आखलेला हा कट होता, असा आरोप केला.
आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी सुरू असताना सरकारच्या प्रतिमेला मात्र तडा गेला तर दोन महिन्यांपासून शांतपणे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमुळे आंदोलन बदनाम झाले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकारकक्षेत कार्यरत असलेल्या दिल्ली पोलिसांनी रॅलीला अनेक मार्गांनी परवानगी बहाल केली होती. तथापि, कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यात ते अपयशी ठरले.
दुसरीकडे शेतकरी नेतेदेखील आपल्या आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण राखू शकले नाहीत. परवानगी बहाल करण्यात आलेल्या मार्गावरूनच रॅली काढण्याची हमी या नेत्यांनी पोलिसांना दिली होती. तथापि, मर्यादेपलीकडे ट्रॅक्टर आणि आंदोलनकर्ते सहभागी झाल्यास गोंधळ होण्याची दिल्लीकरांना भीती होतीच. आज नेमके तेच घडले.
तोडफोडीच्या घटना वगळता फारशी हिंसा नाही
आंदोलनादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला, मात्र तो गोळीबारामुळे नव्हता. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स फेकण्याचे तसेच नांगलोई, आयटीओ आणि इतर तुरळक ठिकाणी झालेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वगळता फारशी हिंसा झालेली नाही. याचे सर्व श्रेय दिल्ली पोलिस तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाला द्यायला हवे. या यंत्रणांनी परिस्थितीचे भान राखून कमालीच्या संयमाचा परिचय दिला आहे.