Delhi Violence: आंदोलन अशांत! हिंसाचारानंतर आंदोलकांमध्ये फूट; 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:28 AM2021-01-28T02:28:49+5:302021-01-28T02:29:08+5:30
लाल किल्ल्यावर पोहोचले आंदोलक,बहुतांश शेतकरी परतीच्या मार्गावर! सीमेवरच राहू; संयुक्त माेर्चा ठाम
विकास झाडे
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेली रॅली थेट दिल्लीत घुसली आणि त्यानंतर दिल्लीत अभूतपूर्व असा हिंसाचार झाला. हा हिंसाचार घडवणारे आणि लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारे आंदोलक नव्हते, असा दावा शेतकरी संघटना करीत आहेत. दुसरीकडे हिंसाचारानंतर आता बहुतांश शेतकरी हे त्यांच्या गावाकडे परतीच्या मार्गावर आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी मात्र सरकार तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत सीमेवरच राहू, असे सांगितले आहे. सरकारने चर्चेची कवाडे खुली आहेत, असा पवित्रा कायम ठेवला आहे.
नेमके काय घडले?
- गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायदे मागे घेणे आणि एमएसपी कायदा तयार करणे यासाठी दोन लाखांवर शेतकरी तळ ठोकून होते. त्यात ७५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
- सरकारसोबत १२ बैठका झाल्यानंतर कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला दिल्लीत रॅली काढण्याची घोषणा केली होती.
- पोलीस प्रशासन आणि शेतकरी नेत्यांमध्ये रॅलीची नियोजित वेळ शेतकऱ्यांनी पाळली नसल्याने गाझीपूर सीमेवर गोंधळ उडाला.
- पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमकी झाल्यात. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि शेतकऱ्यांच्या वाहनांची नासधूस करतानाचे चित्र होते.
शेतकऱ्यांचा आरोप...भाजप प्रणीत नेत्यांनी जमावाला चिथावले
ट्रॅक्टर रॅली सुरू करण्यापूर्वीच संयुक्त किसान मोर्चात घुसलेल्या काही भाजप प्रणीत नेत्यांनी जमावाला चिथावले. त्यामुळे रॅलीला हिंसात्मक वळण मिळाले, अशी प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील शेकडो आंदोलक दिशाभूल झाल्याने अक्षरधामसमोर पोहोचले. पोलिसांचे सुरक्षाकडे तोडत ते आयटीओच्या दिशेने निघाले. दिल्लीची माहिती नसल्याने हजारो आंदोलक पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचल्याचेही ते म्हणाले.
शेतकरी संघटना तोडण्याचा प्रयत्न
चिल्ला सीमेवर शेतकऱ्यांच्या भानु गटाचे आंदोलन सुरू होते. या गटाचे नेते भानु प्रताप सिंह यांनी आज ते आवरते घेतले. परंतु या संघटनेचा संयुक्त किसान मोर्चाशी संबंध नव्हता. त्यांना आधीच काढून टाकण्यात आले होते.
चौकशी करा
ट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांनी घेतला आढावा
दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला.