Delhi Violence: हिंसाचारग्रस्त भागांची महिला आयोगाकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:49 AM2020-02-29T02:49:53+5:302020-02-29T07:01:53+5:30
पीडित महिलांसोबत संवाद साधणार; यूएपीएअंतर्गत चौकशीसाठी हायकोर्टाची केंद्राला नोटीस
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांची राज्य महिला आयोगाने पाहणी केली. दरम्यान या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतंत्र समितीची नेमणूक केली असून, या समितीमध्ये आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांचाही समावेश आहे. ही समिती पीडित महिलांशी संवाद साधणार आहे. दंगलीमध्ये महिलांवर झालेल्या हल्ल्यांची माहिती ही समिती घेईल आणि महिलांचे जबाब नोंदवून घेईल.
जाफराबाद, घोंडा, मौजपूर, चांदबाग, खुरेजी खास व भजनपुरा परिसरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. चार दिवस झालेल्या हिंसाचारात महिला जखमी झाल्या आहेत का, याची माहिती समिती घेईल.
बेकायदेशीर कारवाई (प्रतिबंधात्मक) कायद्यांतर्गत (यूएपीए) दिल्ली हिंसाचाराची चौकशी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने केंद्र व दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले आहे.
हिंसाचाराची चौकशी यूएपीएअंतर्गत व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल व न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना यावर दोन्ही सरकारकडून उत्तर मागितले आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी आता ३० एप्रिलला होईल.
हिंसाचारग्रस्त भागांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पोलीस उपायुक्तांसह पाहणी केली. त्या अनेक पीडित महिलांशी बोलल्या आणि त्यांचे जबाबही यावेळी नोंदवून घेतले. पीडित महिलांना उभे राहण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही मालीवाल यांनी दिले.