Delhi Violence : … यामागील कारण भाजप आणि त्यांच्या काही संस्था; शरद पवारांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:45 PM2022-04-18T22:45:02+5:302022-04-18T22:46:37+5:30
दिल्लीची कायदा सुव्यवस्था ही केंद्र सरकारच्या अखत्यारित, शरद पवार यांचं वक्तव्य.
Violence In Jahangirpuri: १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Delhi Jahangirpuri Violence) हिंसाचार झाल्याची घटना घडली. त्यात झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीदरम्यान नागरिकांसह अनेक पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांकडून काही जणांना अटकही केली. या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दखल घेतली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकर गंभीर आरोप केला आहे.
“रामनवमीच्या वेळी जातीय हिंसाचार झाल्याचं आम्ही कधी ऐकलं नाही. भाजप आणि त्यांच्या काही संस्था यामागील कारण आहेत. दिल्लीची कायदा सुव्यवस्था ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येते,” असं शरद पवार म्हणाले. बंगळुरूमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
चौकशीसाठी गेलेल्यांवरही दगडफेकWe never heard of communal violence during Ram Navami. The reason behind this is the BJP and some of their organisation. Delhi's law and order situation come under the Central government: NCP chief Sharad Pawar in Bengaluru pic.twitter.com/Rz9H9FBbda
— ANI (@ANI) April 18, 2022
हिंसाचारानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच सोमवारी दुपारी हिंसाचार प्रकरणात एका महिलेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. दरम्यान, अॅडिशनल डीसीपी मयंक बन्सल यांना परिसरात पुन्हा दगडफेक झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आलाय त्यावर त्यांनी थेट उत्तर न देता मला आधी परिस्थिती पाहू द्या असं म्हटलं.
सोमवारी काय झालं?
शनिवारच्या हिंसाचारानंतर पोलीस एका महिलेला चौकशीसाठी घेऊन गेले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी जहांगीरपुरी परिसरातील सुमारे ५० महिलांनी निषेध आणि दगडफेक सुरू केली. पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती आरोपी सोनूची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. सोनूने शनिवारी गोळीबार केला होता. महिलेला पोलीस चौकशीसाठी नेल्यानंतर सोमवारी वेगवेगळ्या घरांच्या छतावरुन पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली.