Delhi Violence : दंगलखोरांनी जवानाचे घर जाळले, बीएसएफमधील सहकारी मदतीस धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 04:03 PM2020-02-29T16:03:13+5:302020-02-29T16:06:36+5:30
Delhi Violence: दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान, देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले होते.
नवी दिल्ली - दंगलीच्या भीषण आगीत होरपळणल्यानंतर आता राजधानी दिल्लीतील जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, दिल्लीत उफाळलेल्या जातीय द्वेषाच्या आगीदरम्यान माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. अनेकांचा बळी गेला. देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. दरम्यान, ही बाब बीएसएफमधील त्याच्या वरिष्ठांना समजल्यानंतर त्यांनी या जवानाची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहेत. सदर जवानाचे घर उभारून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे बीएसएफच्या डीजींनी सांगितले आहे.
मोहम्मद अनिस असे घर जाळण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. ते बीएसएफमध्ये सेवेत आहेत. दिल्लीत दंगल भडकल्यावर खजूरी खास परिसरात असलेले हनिफ यांचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. दैव बलवत्तर म्हणून अनिस यांचे कुटुंबीय बचावले. मात्र राहते घरच बेचिराख झाल्याने अनिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
मोहम्मद अनिस यांचा तीन महिन्यांनंतर विवाह होणार आहे. दरम्यान आपल्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटाची माहिती अनिस यांनी आपल्या वरिष्ठांना दिली नव्हती. अखेरीस प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमधून ही गोष्ट त्यांच्या वरिष्ठांना समजली. त्यानंतर बीएसएफने आपल्या जवानाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बीएसएफने एका जवानाच्या माध्यमातून अनिस यांच्या वडिलांशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
बीएसएफचे डीजी विवेक जोहरी यांनी सांगितले की, आम्ही पीडित जवानाची आर्थिक मदत करणार आहोत. तसेच इंजिनियरींग विभागाचे पथक अनिस यांच्या घराची पाहणी करत आहेत. अनिस यांना बीएसएफ वेल्फेयर फंडातून पाच लाख रुपयांचा धनादेश दिला जाईल. तीन महिन्यानंतर विवाह असलेल्या अनिस यांना आमच्याकडून ही भेट असेल.’
संबंधित बातम्या
Delhi Violence : जमावाला भडकविल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या इशरत जहां अटकेत
उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई
Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान, २०१३ मध्ये बीएसएफमध्ये दाखल झालेल्या मोहम्मद अनिस यांनी तीन वर्षे जम्मू काश्मीरमध्ये सेवा दिली आहे. तसेच ते सध्या ओदिशामध्ये कर्तव्यावर आहेत. त्यांची लवकरच दिल्ली येथे बदली करण्यात येईल.