Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 05:49 AM2020-02-28T05:49:43+5:302020-02-28T09:11:56+5:30

‘आप’ सरकारतर्फे मदत जाहीर; गटारे, नाल्यांत सापडत आहेत मृतदेह

Delhi Violence situation under control after 38 peoples lost their lives | Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

Next

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत गुरुवारी पूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तिथे तणाव असून, दुकाने, बाजारपेठा, शाळा, बँका बंदच आहेत. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असून, जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली, तर काँग्रेस नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हे सारे घडले, असा आरोप भाजपने केला.

भाजपने आम आदमी पक्षावरही असाच आरोप केला. त्यातच आपच्या ताहिर हुसेन या नगरसेवकावर आयबी कर्मचाºयाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी आता नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मदत जाहीर केली. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, तर गंभीर जखमींना पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्चही सरकार उचलेल. त्या भागांतील सर्व पीडितांना सरकारतर्फे मोफत जेवण देण्यात येणार आहे. मदतीसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले असून, त्यावर संपर्क साधावा, आपल्या भागात शांतता व सलोखा ठेवावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

या भागांत सरकारने शांतता समित्या स्थापन केल्या आहेत. खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च दिल्ली सरकार ‘फरिश्ते दिल्ली के’ योजनेखाली करणार आहे. हिंसाचार व जाळपोळीत संपत्तीचे नुकसान झालेल्यांना त्यांची कागदपत्रे पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारतर्फे शिबिर घेण्यात येत आहे. ज्यांची वाहने वा दुकाने जळाली आहेत, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य सरकार विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहे. व्यावसायिकांना वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यासाठीही सरकार मदत करेल; तसेच सरकार त्यांना अनुदान देईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४८ एफआयआर दाखल झाले असून, १३० जणांना अटक झाली आहे; तसेच ५० मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सोशल मीडियाद्वारे हिंसाचार भडकविल्याचा पोलिसांचा संशय आहे.

एसआयटीकडे तपास
हिंसाचाराचा तपास दोन विशेष तपास पथकांकडे (एसआयटी) देण्यात आला आहे. गुन्हे शाखेने सर्व प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) पथकाकडे सुपुर्द केले आहेत.
आमच्याकडे अनेक फूटेज असून, त्यांची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हिंसाचारग्रस्त भागात ३५० शांतता समित्या स्थापन केल्या आहेत.

त्यांना दुप्पट शिक्षा द्या
हिंसाचारात जे दोषी आढळतील त्यांना दुप्पट शिक्षा द्यावी, असे केजरीवाल म्हणाले. हिंसाचाराला प्रोत्साहन देणे किंवा प्रक्षोभक भाषण करणे यासाठी कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे हे पाहू नये. माझ्या मंत्रिमंडळातील कुणी असेल तर त्यालाही सोडू नका. त्यांना थेट कारागृहात पाठवा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. देशाच्या सुरक्षेशी संबंधित ही बाब असल्याने कुणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

Web Title: Delhi Violence situation under control after 38 peoples lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.