दिल्लीतील हिंसेवरून विरोधकांनी आपली भाकरी भाजू नये : नकवी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 04:19 PM2020-02-29T16:19:23+5:302020-02-29T16:19:56+5:30
हिंसेचे वृत्त आले त्याचवेळी सद्भावना आणि बंधुभावाच्या घटना देखील समोर आल्या आहेत. भारताच्या विविधतेत असलेल्या एकतेमुळेच हे शक्य झालं आहे. एकता आणि सद्भावनाच भारताच्या धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा आत्मा असल्याचे नकवी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील हिसेंवरून भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नकवी म्हणाले की, काही राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचे नेते हिंसेतील पीडितांच्या जखमांवर मीठ चोळत असून हिंसा पुन्हा भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राजधानीत पुन्हा शांतता स्थापन होईल, असा विश्वासही नकवी यांनी व्यक्त केला.
जमावाला भडकविणारे लोक लवकरच कारागृहात दिसतील. शांतता स्थापन करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मात्र पीडितांच्या जखमा ठिक करण्याऐवजी काही राजकीय पक्ष त्यावर मीठ चोळत आहेत. दिल्लीतील हिंसा पीडितांना न्याय मिळवा ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे नकवी यांनी म्हटले.
दरम्यान हिंसेचे वृत्त आले त्याचवेळी सद्भावना आणि बंधुभावाच्या घटना देखील समोर आल्या आहेत. भारताच्या विविधतेत असलेल्या एकतेमुळेच हे शक्य झालं आहे. एकता आणि सद्भावनाच भारताच्या धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा आत्मा असल्याचे नकवी यांनी म्हटले आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 42 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 123 एफआयआर दाखल केल्या आहेत. तर 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसेची चौकशी करण्यासाठी दोन एसआयटी टीम स्थापन केल्या आहेत.