Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 01:06 PM2020-02-27T13:06:49+5:302020-02-27T13:12:21+5:30
Delhi Violence News : उत्तर-पूर्व दिल्लीमधील खजुरी परिसरात दंगल भडकवण्यामध्ये आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - दिल्लीत पेटलेल्या दंगलीबाबत आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. दंगलीनंतर समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्या दंगलीदरम्यानच्या भूमकेबाबत संशय निर्माण झाला आहे. तसेच ताहीर हुसेन यांच्या घरामधून पेट्रोल बॉम्ब, कट्टे, दगड विटांचा साठा सापडला आहे. दरम्यान, यापूर्वीसुद्धा या घराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये या घरातून दगड आणि पेट्रोल बॉम्बचा मारा होतान दिसत होता. दरम्यान, ताहीर हुसेन यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तसेच आम आदमी पक्षानेसुद्धा त्यांचा बचाव केला आहे.
उत्तर-पूर्व दिल्लीमधील खजुरी परिसरात दंगल भडकवण्यामध्ये आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच ताहीर हुसेन आणि त्यांच्या समर्थकांवर यापूर्वी गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा ताहीर हुसेन यांच्यावर आरोप केले होते.
दरम्यान, दिल्लीतील तणावाचे वातावरण काहीसे निवळल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ताहीर हुसेन यांचे घर गाठले. तेव्हा ताहीर हुसेन यांच्या घराच्या छतावर मोठ्या प्रमाणात दगडांचा साठा दिसून आला. तसेच तिथे दगडांचा भुगाही दिसून आला. मोठमोठे दगड फोडून तिथे छोटे दगड छोटे केले गेले असावे, असा संशय त्यामधून येतो. त्याशिवाय शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरलेले दिसून आले. त्या बाटल्यांवर कपडे बांधून पेट्रोल बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न झाला होता. याशिवाय काही कट्टे आणि गोण्यांमध्ये भरलेले दगडही दिसून आले.
मात्र ताहीर हुसेन यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. जेव्हा दंगल झाली तेव्हा मी घरात नव्हतो. पोलिसांना मला आधीच तिथून नेले होते. माझ्या घरातून कोणी बॉम्बफेक केली हे मला ठावूक नाही. समोरच्या घरांतूनही माझ्या घराच्या दिशेने दगड भिरकावले जात होते, असा दावा त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
Delhi Violence: कोण आहे ताहिर हुसैन?; गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप
Delhi Violence : न्यायाधीशांच्या मध्यरात्री केलेल्या बदलीविरोधात प्रियंका गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Delhi Violence: दिल्ली हिंसाचारातील पीडित बेघर मुस्लीम कुटुबीयांना दिला हिंदू परिवाराने आसरा
आम आदमी पक्षानेसुद्धा ताहीर हुसेन यांचा बचाव केला आहे. दंगल भडकल्यानंतर तब्बल आठ तासांनी पोलीस हुसेन यांच्या घरी पोहोचले. या प्रकरणी निष्पक्षपातीपणे तपास झाला पाहिजे, अशी मागणी आपचे नेते संजय सिंह यांनी केली आहे.