Delhi Violence: शांतता, तणाव आणि आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 02:23 AM2020-02-28T02:23:28+5:302020-02-28T02:25:21+5:30
हिंसाचारावरून नेत्यांनी राजकारण सुरू केले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
- विकास झाडे
नवी दिल्ली : दिल्ली गुरुवारी शांत होती. सुरक्षा चोख असली तरी तीन दिवसांतील हिंसक घटनांचा थरकाप कायम आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. किती मारले गेले याचा निश्चित आकडा पोलीसही सांगून शकत नाहीत. नाल्यांतून रोज मृतदेह काढले जात आहेत. या हिंसाचारावरून नेत्यांनी राजकारण सुरू केले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
ईशान्य दिल्लीत पोलीस व अर्धसैनिक दलाच्या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे दिलासा आहे. बुधवारी रात्रभर संदवेनशील ठिकाणी ड्रोनचा पहारा होता. त्यामुळे भीती थोडी कमी झाली आहे. परिसरातील लोकही पोलिसांना सहकार्य करीत आहे. कुठे हिंसाचाराची शक्यता दिसल्यास पोलिसांना माहिती देत आहेत. दंगेखोरांना सोडू नका अशीच सर्व धर्मांच्या लोकांची भूमिका आहे.
या भागांतील बाजारपेठा बंद आहेत. शाळा, खासगी रुग्णालये, बॅँकाही बंद आहेत. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. दुधासाठी भांडी घेऊन लोक फिरत आहेत. काहींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जाळपोळीमुळे वाहने व घरांचे सांगाडे सर्वत्र दिसत आहेत. त्यामुळे परिसर भकास आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दंगलग्रस्त भागातील लोकांना जेवण पाठविण्यास सुरूवात केली आहे.
सार्वजनिक वाहतूक बंद झाल्याने लोकांची गैरसोय झाली आहे. या परिसरातील मेट्रो स्टेशन आज सुरू झाल्याने लोक घराबाहेर पडतील, असे सुरक्षा यंत्रणेला वाटते. आम्ही एकही गोळी झाडली नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. परंतु हजारावर गोळ्या झाडल्याचे स्पष्ट आहे. या गोळ्या आल्या कुठून हे गुलदस्त्यात आहे. दोनशेवर लोक जखमी झालेत. बळी गेले, तेही बहुतांशी गोळीबारातच अनेक भागांत एवढे दगड-विटा आले कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.