Delhi Violence: ईशान्य दिल्लीत सर्व भागात हिंसाचार घडला; पण न्यू जाफराबाद कॉलनी सुरक्षित राहिली, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:49 AM2020-02-28T10:49:45+5:302020-02-28T10:53:07+5:30
Delhi Violence News: हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे
बाबरपूर - सीएए कायद्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाने ईशान्य दिल्लीत हिंसक वळण घेतलं. या अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. गाड्या जाळल्या गेल्या, दुकानं बंद झाली. मौजपूर, जाफराबाद, दयालपूर याठिकाणी आजही तणावाची परिस्थिती आहे. मात्र तिन्ही बाजूने दंगलसदृश परिस्थिती असताना न्यू जाफराबादमध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यातील ऐक्य पाहायला मिळालं.
न्यू जाफराबादमधील लोकांच्या जागरुकतेमुळे येथील परिसर सुरक्षित राहिला. या परिसरातील लोक दिवस रात्र पहारा देतात. बाहेरील लोकांवर करडी नजर ठेवतात. दंगलखोरांनी येथेही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र याठिकाणच्या लोकांनी त्यांना तीन वेळा हाकलवून लावले.
दंगल सुरू झाल्याच्या दुसर्याच दिवशी २४ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ च्या सुमारास काही तरुणांना सुदामापुरी मार्गे न्यू जाफराबादमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात काठ्या, दांडे, लोखंडी सळ्या व साखळी वगैरे होते. सुदामपुरी गल्ली क्रमांक १२ मधील २५-३० तरुणांचा एक गट तेथे पोहोचला. जोरदारी घोषणाबाजी करु लागले. गल्लीच्या दुसर्या टोकाला मेन बाबरपूर आहे. न्यू जाफराबादच्या दिशेने दंगलखोर पुढे जाऊ लागले. तेव्हा सुदामपुरीच्या लोकांनी त्यांना आव्हान दिले. त्यावेळी काही जण घाबरले, स्थानिकांच्या इशाऱ्यानंतर या दंगलखोरांनी येथून पळ काढला.
दहशत पसरवण्यासाठी दोनदा प्रयत्न बुधवारी रात्री झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास रोहताश नगरात नाल्यामार्फत काही दंगलखोर घोषणाबाजी करत कॉलनीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी स्थानिकांनी त्यांना रोखत कॉलनीतून मागे फिरण्यास भाग पाडले. यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास बाहेरील लोकांचा दुसरा गट त्याच मार्गाने कॉलनीत पोहोचला. हिंसक तरुणांनी स्थानिकांवर गोळ्या चालवल्या. स्थानिकांनी समजूतदारपणा दाखवत कोणत्याही चिथावणीला उत्तर न देता तातडीने पोलिसांनी फोन करुन माहिती दिली. काही वेळानंतर निमलष्करी दलाचे जवान दाखल झाले त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे, तर काँग्रेस नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हे सारे घडले, असा आरोप भाजपाने केला. त्यातच आपच्या ताहिर हुसेन या नगरसेवकावर गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी आता नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.