Delhi Voilence: पती आल्यानंतरच जेवण करणार; हिंसाचारात मृत्यू झालेल्या पोलीस पत्नीचा हट्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 01:36 PM2020-02-26T13:36:06+5:302020-02-26T13:42:48+5:30
Delhi Voilence News: रतनलाल यांच्या आईला अद्याप आपला मुलगा गेलाय याची कल्पनाही नाही
नवी दिल्ली - सीएएविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं आहे. सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्याने दगडफेक, जाळपोळ सुरु झाली. या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस शिपाई रतनलाल यांचाही मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर रतनलाल यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
रतनलाल यांच्या आईला अद्याप आपला मुलगा गेलाय याची कल्पनाही नाही. गावात शांतता पसरली आहे. रतनलाल यांचे नातेवाईक डॉ. हेमबारी म्हणाले की, दिल्लीवरुन रतनलाल यांचा मृतदेह रवाना झाला आहे. त्यांच्यावर पैतुक येथील तिहावली गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अलीकडेच २२ फेब्रुवारीला रतनलाल यांनी पत्नीसह लग्नाचा वाढदिवस साजरा केला. मात्र या घटनेमुळे त्यांची पत्नी पूनम सुन्न झाली आहे. पती परतल्यानंतरच मी जेवण करणार असा हट्ट तिने धरला आहे.
रतनलाल यांना शहीद दर्जा देण्यात यावा, तसेत पूनम यांना नोकरी, ३ मुलांना केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षण, २ कोटी आर्थिक मदत द्यावी, तसेच आरोपींना फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते. वडिलांच्या मृत्यूनंतर रतनलाल यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. कुटुंबात २ लहान भाऊ, एक बहिण आहे.
Home Minister Amit Shah writes a letter to wife of Delhi Police Head Constable Ratan Lal, who died during clashes over Citizenship Amendment Act in Northeast Delhi, yesterday. He writes, "I express grief & deep condolences on untimely death of your husband". #DelhiViolencepic.twitter.com/ZP3nJT9Fzn
— ANI (@ANI) February 25, 2020
रतनलाल यांनी २२ फेब्रुवारीला कुटुंबासह दिल्लीत लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. दिल्लीत रतनलाल यांच्या मृत्यूनंतर पत्नी पूनमला धक्का बसला आहे. याबाबत लहान भाऊ दिनेश यांनी सांगितले की, सध्या तीन मुलांचा सांभाळ शेजारचे करत आहेत. मोठी मुलगी रिद्धी हिला वडिलांच्या निधनाची माहिती नाही. रतनलाल सोमवारी उपवास ठेवायचे, घटनेच्या दिवशी सोमवार असल्याने त्यांचे व्रत होते. सकाळी घरातून ११ वाजता ते निघाले ते परतलेच नाही.
दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयाबैठक घेतली. दिल्लीतील परिस्थितीवर डोवाल लक्ष ठेवून आहेत. डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.