दिल्लीत बिछान्यात सापडला महिलेचा मृतदेह, पती फरार; ५ वर्षांपूर्वी झाले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:31 IST2025-01-04T13:29:38+5:302025-01-04T13:31:05+5:30
दिल्लीत एका घरात बेडमध्ये एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीत बिछान्यात सापडला महिलेचा मृतदेह, पती फरार; ५ वर्षांपूर्वी झाले होते लग्न
Delhi Crime:दिल्लीत बिंदापूर परिसरात हादरवणारी घटना समोर आली आहे. बिंदापूरमध्ये पतीने पत्नीचा खून करून मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दीपा (२४) असे मृत महिलेचे नाव असून ती डाबरीच्या जानकीपुरी भागातील रहिवासी आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी तिचे लग्न कॅब चालक धनराजसोबत झाले होते. या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगीही आहे. ज्योती ती पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. महिलेच्या पतीनेच हा गुन्हा केल्याचा संशय आहे. सध्या आरोपी पती धनराज फरार आहे.
३ जानेवारी रोजी डाबरी पोलीस ठाण्यात महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दीपाच्या खोलीला बाहेरून कुलूप होते. यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून बेडच्या आतून मृतदेह बाहेर काढला. दीपाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या पतीने तिचा खून करून मृतदेह बेडरूममध्ये लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे.
महिलेचे वडील अशोक चौहान यांच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध भादंवि कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक चौहान यांनी पोलिसांत सांगितले की, २९ डिसेंबरला आपले मुलीशी बोलणे झाले होते. तेव्हापासून तिचा फोन बंद आहे. संशय आल्याने मी आपल्या मुलीच्या घरी जाऊन पाहिले तेव्हा घरातून दुर्गंधी येत होती. याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बेड उघडले असता आत मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. मात्र, या घटनेमागचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेच्या वेळी आरोपी आणि महिला घरात एकटेच होते. त्यांची मुलगी तिच्या माहेरच्या घरी होती. यावेळी त्यांच्यात भांडण झाल्याचा संशय असून या हाणामारीदरम्यान आरोपीने दीपाची हत्या करून तिचा मृतदेह पलंगावर टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम तैनात केली आहे.