अरेरे! दिल्लीहून बिहारला गेली 'ती'; Airtel ने पाठवलं 1 लाखाचं रोमिंग बिल; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 05:51 PM2023-12-07T17:51:10+5:302023-12-07T18:09:02+5:30
महिलेने तक्रार केली असता, कंपनीने याप्रकरणी मदत करू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच महिलेचं सिमही बंद झाले, ज्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं.
दिल्लीहून बिहारला गेलेल्या एका महिलेने आपल्याला एक लाख रुपयांचं इंटरनॅशनल रोमिंग बिल पाठवल्याचा आरोप केला आहे. याबाबत महिलेने तक्रार केली असता, कंपनीने याप्रकरणी मदत करू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच महिलेचं सिमही बंद झालं, ज्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं.
नेहा सिन्हा हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट लिहून तिला आलेला अनुभव शेअर केला आहे. एअरटेलने तिला भलं मोठं आंतरराष्ट्रीय रोमिंग बिल पाठवलं. जेव्हा ती बिहारच्या सीमावर्ती भागात असलेल्या वाल्मिकी नगरमध्ये पोहोचली तेव्हा तिला एअरटेल कंपनीने चक्क एक लाख रुपयांचं बिल पाठवलं.
A terrible scam! I'm in Valmiki Nagar, Bihar. @airtelindia sends me a roaming bill of ₹1L+. I'm an INDIAN citizen on INDIAN soil. With no outstanding bill, Airtel cuts my services. Leaving me stranded!
— Neha Sinha (@nehaa_sinha) December 6, 2023
Shame on you @airtelindia! Do look into this @DoT_India@AshwiniVaishnawpic.twitter.com/f7BT321Xv1
"एक भयंकर घोटाळा! मी वाल्मिकी नगर, बिहार येथे आहे. एअरटेल इंडियाने मला 1 लाखाहून अधिकचं रोमिंग बिल पाठवलं आहे, मी भारतीय भूमीवर एक भारतीय नागरिक आहे. बिलाची थकबाकी नसतानाही, एअरटेलने माझी सेवा बंद केली आणि यामध्ये मला अडकवलं आहे" असं नेहाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"एअरटेल विनाकारण सेवा बंद करून महिलांची सुरक्षा धोक्यात आणत आहे. खरं तर, मी भारतात असताना एअरटेलने मला बिल पाठवलं आहे. जेव्हा मी एअरटेल कस्टमर केअरला कॉल करण्यासाठी दुसरा फोन वापरला, तेव्हा त्यांनी सांगितले की, ते काहीही करू शकत नाहीत कारण हेच 'सिस्टम'ने लॉग केलं आहे. सिस्टम देव आहे का? ही कोणती व्यवस्था आहे जी माणसांचं नुकसान करते?" असा सवाल नेहाने विचारला आहे. जर नेहाला सिम रिस्टोअर करायचे असेल तर तिला 1,792 रुपये द्यावे लागतील.असं उत्तर कंपनीने दिलं आहे.