दोन वर्षांचा मुलगा मांडीवर झोपलेला असताना पतीने केली पत्नीची हत्या, कर्जदारांपासून सुटका करुन घेण्यासाठी संपवले पत्नीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 12:55 PM2017-10-26T12:55:45+5:302017-10-26T13:12:38+5:30
पंकजने प्रियाची गोळया झाडून हत्या केली तेव्हा त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रियाच्या मांडीवर झोपला होता.
नवी दिल्ली - दिल्लीच्या शालिमार बाग परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या विवाहित महिलेच्या हत्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पती पंकजला अटक केली आहे. पती पंकज मेहरानेच हल्ला झाल्याचा बनाव रचून पत्नी प्रिया मेहराची हत्या केल्याचे उघड झाले आहे. माझी गाडी दिल्लीच्या शालिमार बाग भागामधून जात असताना वेगात एक वाहन ओव्हरटेक करुन पुढे जाऊन थांबले व त्यातून उतरलेल्या आरोपींनी अंदाधुंद गोळीबार केला. त्याता प्रियाचा मृत्यू झाला असे पंकजने पोलिसांना सांगितले होते.
पंकजने प्रियाची गोळया झाडून हत्या केली तेव्हा त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रियाच्या मांडीवर झोपला होता. पंकज पेशाने हॉटेल व्यावसायिक आहे. सध्या त्याचा हॉटेलचा बिझनेस नीट चालत नव्हता. त्याच्या डोक्यावर 40 लाखांचे कर्ज होते. कर्जाची रक्कम आणि व्याज भरत नसल्याने त्याला कर्जदारांकडून धमक्या मिळत होत्या. पंकजने दुसरे लग्नही केले होते. तो प्रियाबरोबर राहत नव्हता.
पंकज आणि प्रियामध्ये बरेच खटके उडत होते. पण दोनवर्षाच्या मुलासाठी ते एकत्र होते. अशा परिस्थितीत कर्जदारांना अडकवण्यासाठी म्हणून त्याने आपल्याच पत्नीच्या हत्येचा कट रचला. प्रियाची हत्या केल्यानंतर सर्व आरोप कर्जदारांवर लावता येतील. आपल्याला कर्जाची परतफेड करावी लागणार नाही असा विचार करुन त्याने प्रियाची हत्या केली. अकरावर्षापूर्वी प्रिया आणि पंकजचा विवाह झाला होता. हे कुटुंब गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन गाडीने घरी परतत असताना शालिमार बाग भागात ही हत्या झाली.
प्रियावर उपचाराला विलंब झाल्याबद्दल तिच्या कुटुंबाने आधी पोलीस आणि रुग्णालयावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. प्रियाला रुग्णालयात आणले त्यावेळी सुरुवातीला डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिला. पोलीस आल्यावरच आम्ही उपचार सुरु करु असे रुग्णालयाने सांगितले असे कुटुंबियांचे म्हणणे होते. त्याचवेळी हद्दीच्या मुद्यावरुन पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते त्यामुळे उपचाराला आणखी विलंब लागला. दिल्लीत गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढली आहे. मागच्या तीन दिवसात पाच हत्या झाल्या आहेत.