बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेला अन् त्याचा मृतदेहच मायदेशी परतला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:30 PM2019-09-26T12:30:41+5:302019-09-26T12:31:35+5:30
बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सौरभ शर्मा असे या तरुणाचे नाव असून, तो दिल्लीमधील न्यू अशोकनगर परिसरात राहणारा आहे. सौरभ हा त्याच्या मित्रांसोबर बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेला होता. तेथे त्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत स्वीमिंग पूलमध्ये सापडला.
पेशाने इंजिनियर असलेल्या सौरभ याचा विवाह 21 नोव्हेंबर रोजी होणार होता. त्यामुळे त्याच्या बॅचलर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सौरभला प्रवासाची आवड होती. त्यामुळे यावेळी त्याने मित्रांसह थायलंडला जाण्याचा प्लान आखला होता. थायलंडमधील ज्या हॉटेलचे बुकींग केले होते तिथे पोहोचल्यानंतर भोजन करून तो पोहण्यासाठी गेला. मात्र स्वीमिंग पूलमध्ये असतानाच अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, 36 तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, सौरभचे वडील महिपाल शर्मा यांनी जेव्हा हॉटेलकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा हॉटेल व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास नकार दिला. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही काही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सौरभची हत्या झाली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
सौरभचे वडील म्हणाले की, 'पोलिसांनी सांगितले की सौरभचा मृत्यू रुग्णालयात जाताना झाला. जर असं असेल तर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात का ठेवले. सौरभचा जर रुग्णालयात जाताना मृत्यू झाला तर मग उपचारांसाठी पैसे का द्यावे लागलेत. सौरभवरील उपचारांसाठी आम्ही रुग्णालयाला 18 लाख रुपये दिले, असे जेव्हा आम्ही पोलिसांना सांगितले. तेव्हा त्यांनी आपला जबाब बदलून सौरभचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला, असा उल्लेख केला.'
दरम्यान, सौरभच्या वडिलांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच आपल्या मुलाच्या मृत्यूची योग्य ती चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.