युरोप आणि अमेरिकेपेक्षा दिल्लीतील नागरिकांना प्रदूषणाचा पाचपट धोका जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 01:04 PM2018-07-11T13:04:01+5:302018-07-11T13:04:39+5:30
बीजिंगमध्ये 2000 साली 15 लाख वाहने होती ती 2014 साली 50 लाख इतकी झाली. तर दिल्लीमध्ये 2014 साली 47 लाख वाहने होती ती 2030 पर्यंत 2 कोटी 56 लाख इतकी होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- युरोप आणि अमेरिकेतील नागरिकांपेक्षा दिल्लीमध्ये राहाणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा पाचपट जास्त धोका असल्याचे संशोधकांनी मत मांडले आहे. त्याचप्रमाणे आशियातील नागरिकांना युरोप-अमेरिकेपेक्षा प्रदूषणाचा 9 पट धोका जास्त असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओच्या मतानुसार आशियातील निम्न व मध्यम उत्पन्न गटातील लोकांच्या अकाली मृत्यूपैकी 88 टक्के मृत्यू हे वायूप्रदूषणाशी निगडीत आहेत.
बीजिंगमध्ये 2000 साली 15 लाख वाहने होती ती 2014 साली 50 लाख इतकी झाली. तर दिल्लीमध्ये 2014 साली 47 लाख वाहने होती ती 2030 पर्यंत 2 कोटी 56 लाख इतकी होण्याची शक्यता आहे.
इंग्लंडमधील सरी विद्यापिठामधील तज्ज्ञांनी हवेतील कार्बन कणांचे निरीक्षण केले. हे कार्बन कण इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतात आणि लोकांच्या फुप्फुसामध्ये जातात. आशिया खंडातील देशांमध्ये रस्त्यांच्या कडेला चालणाऱ्या लोकांना युरोप-अमेरिकेतील नागरिकांपेक्षा या कणांशी 1.6 पट जास्त सामना करावा लागतो. आशियातील कारचालकांचा युरोप अमेरिकेपेक्षा प्रदूषणाशी 9 पट संबंध जास्त येतो तर पादचाऱ्यांना सातपट अधिक ब्लॅक कार्बन लेव्हलचा सामना करावा लागतो. नवी दिल्लीमध्ये युरोप आणि उत्तर अमेरिकेपेक्षा कारमध्ये ब्लॅक कार्बन कॉन्सन्ट्रेशनचे प्रमाण 5 पट अधिक आहे.