दिल्लीचा २७0 कि.मी.चा नवा रिंग रोड वर्षअखेर
By admin | Published: April 29, 2017 12:34 AM2017-04-29T00:34:43+5:302017-04-29T00:34:43+5:30
दिल्ली महानगर वर्षअखेरीला मोकळा श्वास घेऊ शकेल. प्रदूषणाने काळवंडलेल्या आणि वाहनांच्या गर्दीने गुदमरलेल्या दिल्लीला
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
दिल्ली महानगर वर्षअखेरीला मोकळा श्वास घेऊ शकेल. प्रदूषणाने काळवंडलेल्या आणि वाहनांच्या गर्दीने गुदमरलेल्या दिल्लीला परिवहन मंत्री नितीन गडकरींनी शुक्रवारी हे शुभवर्तमान ऐकवले. येत्या डिसेंबर पासून परराज्यातून दिल्लीत दाखल होणाऱ्या आणि लगेच अन्य राज्यांकडे कूच करणाऱ्या हजारो ट्रक्स यापुढे दिल्लीत दाखल होणारच नाहीत. या महानगरात विनाकारण शिरणाऱ्या तमाम वाहनांसाठी दिल्लीच्या दशादिशांना व्यापणाऱ्या २७0 कि.मी. अंतराच्या पूर्व आणि पश्चिम परिघाकृती एक्सप्रेसवे चे ६0 टक्के काम पूर्ण झाले आहे. दिल्लीला वेढणारा हा नवा रिंग रोड वर्षअखेरीला तयार होईल व पंतप्रधानांच्या हस्ते तो राष्ट्राला अर्पण केला जाईल, असे उद्गार नितीन गडकरींनी पत्रकारांशी बोलतांना काढले.
पूर्व आणि पश्चिम परिघाकृती एक्सप्रेसवे (ईस्टर्न अँड वेस्टर्न पेरिफेरल एक्सपे्रसवे) असे या महत्काकांक्षी प्रकल्पाचे नाव असून २७0 किलोमीटर्सच्या या रिंग रोडचे १८३ किलोमीटर्सचे अंतर हरयाणात तर ८७ किलोमीटर्सचे अंतर उत्तरप्रदेशात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे नंतर दिल्लीजवळ पूर्व एक्सप्रेसवे हा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त देशातला दुसरा एक्सप्रेसवे ठरणार आहे. शुक्रवारी गडकरींनी दिल्लीतल्या ५0 पत्रकारांसह या नव्या रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी केली व पत्रपरिषदेनंतर हेलिकॉप्टरद्वारे कामाच्या प्रगतीचे निरीक्षणही केले. या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पत्रकारांशी हितगुज करतांना गडकरी म्हणाले, हरयाणातल्या कुंडली गावापासून पलवलपर्यंत १३५ किलोमीटर्सच्या अंतरात हा अर्धवर्तुळाकार पूर्व एक्सप्रेसवे पसरला असून याच्या दोन्ही टोकांना दुसऱ्या १३५ किलोमीटर्स अंतराच्या पश्चिम एक्सप्रेसवे ची उर्वरित दोन टोके जोडली गेली आहेत. परिणामी या वर्तुळाकार मार्गाचे २७0 किलोमीटर्सच्या भव्य रिंग रोडमधे रूपांतर झाले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामासाठी ४४१८ कोटी खर्च आला आहे तर भूसंपादनासाठी बाजारभावानुसार ५९00 कोटी जमीन मालकांना अदा करण्यात आले आहेत.
नद्यांचे ड्रेझिंग करून वाळू फुकट मिळवणे, जमशेदपूरला लोखंडावर प्रक्रिया करतांना वाया जाणारे आॅईल स्लॅग, औष्णिक प्रकल्पांची कोल अॅश इत्यादींचा वापर रस्त्यात भर घालण्यासाठी करणे, शेतकऱ्यांना मोफत शेततळी तयार करून देतांना खोदकामातून मिळालेली माती विनामूल्य दरात रस्त्त्यात भर घालण्यासाठी वापरणे, यात शेतकरी आणि सरकार दोघांचाही लाभ आहे, असे गडकरी म्हणाले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नटलेला एक्स्प्रेस वेअत्याधुनिक तंत्रज्ञानाने नटलेल्या या एक्सप्रेसवे वर हायवे मॅनेजमेंट सिस्टिमसह विशिष्ट टप्प्यांवर वाहनतळ, आहार, विश्रांती आणि इंधनासह साऱ्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो झाडे लावण्यात येणार असल्याने हा मार्ग हिरवाईने सजलेला असेल. यमुना व हिंडन नद्या आणि आग्रा कॅनॉलवर तीन मोठे पूल, तसेच जागोजागी ७७ अंडरपास तयार करण्यात येत आहेत.
या रस्त्यावर अपघाती मृत्यू अथवा प्राणहानी होऊ नये यासाठी सुरक्षा विषयक साऱ्या दक्षता घेण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी परिवहन मंत्रालयाने अनेक कल्पक गोष्टी राबवल्या.