दिल्लीतील हवा बनली आणखी विषारी; एनसीआरमध्ये इमारतींचे बांधकाम, पाडकामावर तात्पुरती बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 07:08 AM2022-10-30T07:08:02+5:302022-10-30T07:08:21+5:30
दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी वाढत्या वायू प्रदूषणाबरोबरच धुकेही दाटले होते.
नवी दिल्ली : दिवाळीत दिल्लीतील हवेचा दर्जा काही प्रमाणात सुधारल्याने दिल्लीकर सुखावले होते; पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दिल्लीत शनिवारी हवेच्या दर्जाचा सरासरी निर्देशांक ३९७वर पोहोचला. प्रदूषणाची ही धोकादायक पातळी असून ते जानेवारी महिन्यापासूनचे सर्वाधिक प्रमाण आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण आणखी वाढू नये, यासाठी एनसीआर भागात इमारतींची बांधकामे व पाडकामावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी वाढत्या वायू प्रदूषणाबरोबरच धुकेही दाटले होते. दिल्लीतील हवेच्या दर्जाचा सरासरी निर्देशांक सोमवारी ३१२, मंगळवारी ३०२, बुधवारी २७१, गुरुवारी ३५४ इतका होता. वायू प्रदूषणाचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी रविवारी एक बैठक बोलाविली आहे. त्यामध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येईल.
अत्यावश्यक गोष्टींना बंदी लागू नाही
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एनसीआर भागातील इमारतींच्या बांधकाम तसेच पाडकामावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय दि कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट या केंद्र सरकारच्या संस्थेने घेतला. दिल्लीच्या एनसीआर भागातील सर्व यंत्रणांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश सीएक्यूएमने दिले आहेत. मात्र, ही बंदी संरक्षण, लष्कर, रेल्वे, मेट्रो रेल्वे आदी अत्यावश्यक गोष्टींच्या कामांना लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.