दिल्लीत आता खटल्यांची ‘जंग’
By admin | Published: December 22, 2015 02:52 AM2015-12-22T02:52:29+5:302015-12-22T02:52:29+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या अन्य पाच नेत्यांविरुद्ध पतियाळा हाऊस कोर्टात १० कोटी रुपयांच्या अबु्रहानीचा दिवाणी खटला दाखल केला आहे
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या अन्य पाच नेत्यांविरुद्ध पतियाळा हाऊस कोर्टात १० कोटी रुपयांच्या अबु्रहानीचा दिवाणी खटला दाखल केला आहे. दुसरीकडे आपनेही जेटलींविरुद्ध भ्रष्टाचाराबद्दल एफआयआर दाखल करण्याची चाचपणी चालविली आहे.
केजरीवालांसह आपचे नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंग, राघव चड्डा आणि दीपक वाजपेयी या नेत्यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचाराबद्दल जबाबदार धरत माझी आणि कुटुंबीयांची बदनामी केल्याचे जेटलींनी म्हटले होते. वैयक्तिक पातळीवर ही तक्रार करण्यात आली असून सादर करण्यात आलेले दस्तऐवज पाहता मी गुन्ह्णाची दखल घेतली आहे.
५ जानेवारी २०१६ रोजी दुपारी २ वाजता तक्रारकर्त्याला पुरावे सादर करण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांनी सांगितले. ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथ्रा यांनी जेटलींची बाजू मांडली. जेटली यांनी डीडीसीएमधून एकही पैसा घेतलेला नाही. आपच्या नेत्यांनी जेटली आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक आहेत. या नेत्यांनी केवळ पत्रपरिषदेतच नव्हे तर टिष्ट्वटर अकाऊंट, फेसबुक पोस्ट आणि पत्रकांद्वारे बदनामीकारक विधाने केली, असे लुथ्रा यांनी स्पष्ट केले.
डीडीसीएमधील भ्रष्टाचाराशी निगडित वादात मला ओढण्यात आले. प्रत्येक बाबीसाठी मी कशी काय दोषी ठरते, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अरुण जेटली यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, प्रत्येक बाबीसाठी मीच दोषी आहे काय?
भाजपचे खा. कीर्ती आझाद यांनी तत्कालीन संपुआ सरकारला पत्र पाठविल्यानंतर सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत मला लक्ष्य बनविण्याची योजना आखली गेली होती, असा आरोप जेटलींनी एका मुलाखतीत आझाद यांचा नामोल्लेख टाळत केला होता.
दिल्ली मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत डीडीसीएमधील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग नियुक्त केला आहे.
>>>>>>> अशा खटल्यांना आम्ही घाबरणार नाही- केजरीवाल
नवी दिल्ली : आम आदमी पार्टी दिवाणी किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या अब्रुहानीच्या खटल्यांना घाबरणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी म्हटले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी डीडीसीए क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी दिल्ली सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगासमोर आपले निरपराधित्व सिद्ध करावे, तसेच त्यांनी तपासात सहकार्य करावे, या शब्दांत त्यांनी आव्हानही दिले.
आमच्याविरुद्ध खटले दाखल करून जेटलींनी आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करू नये. आमचा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा कायम राहील, असे ते टिष्ट्वटरवर म्हणाले.
आम्ही हे प्रकरण दडपले जाऊ देणार नाही. आम्ही त्यांना डीडीसीएतील भ्रष्टाचाराबद्दल जबाबदार धरत राहू, असे आप नेते संजयसिंग म्हणाले. आपचे दुसरे नेते आशुतोष म्हणाले की, जेटलींनी आम्हाला कारागृहात पाठविण्याची धमकी देऊ नये. त्याऐवजी आम्ही विचारलेल्या विशिष्ट प्रश्नांना उत्तरे द्यावीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)