दिल्लीचा कौल ‘आप’ला

By Admin | Published: February 8, 2015 02:57 AM2015-02-08T02:57:40+5:302015-02-08T02:57:40+5:30

उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या चुरशीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शनिवारी राजधानीतील ६७.१४ टक्के मतदारांनी मतदान केले.

Delhi's Kaul, AAP | दिल्लीचा कौल ‘आप’ला

दिल्लीचा कौल ‘आप’ला

googlenewsNext

एक्झिट पोलचे भाकीत : विधानसभेसाठी ६७ टक्के मतदान, भाजपाची हवा गुल
नवी दिल्ली : उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या चुरशीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शनिवारी राजधानीतील ६७.१४ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदानाचा कौल आम आदमी पार्टी (आप)च्या बाजूने गेल्याचे भाकीत विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी ‘एक्झिट पोल’ (मतदानोत्तर चाचणी)च्या आधारे वर्तविले.
७० सदस्यीय विधानसभेसाठी ‘आप’ला मिळणाऱ्या संभाव्य जागांच्या आकड्यात तफावत असली, तरी भाजपाला सत्ता मिळणार नाही आणि ‘आप’ला निर्विवाद बहुमत मिळेल, हेच सर्वच्या सर्व एक्झिट पोलमधून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपाची विजयी वाटचाल रोखण्याचे काम राजधानीतील मतदारांनी केल्याचे चित्र निकालापूर्वीच तयार झाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत करणाऱ्या एक्झिट पोलपैकी एका चाचणीत ‘आप’ला सर्वाधिक ५३ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. वृत्तवाहिन्यांनी शनिवारी दिवसभर दाखविलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजपा हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कुठल्याही चाचणीत काँग्रेसला पाचच्या वर जागा दाखविण्यात आलेल्या नाहीत.
परिणामी निकालानंतर पराभवाचे खापर भाजपात कोणाच्या माथी फोडले जाणार, तसेच अपश्रेयाचा धनी ठरविण्यावरून भाजपात होणाऱ्या संभाव्य सुंदोपसुंदीबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

कडक बंदोबस्तात मतदान;१० फेब्रुवारीला निकाल
सकाळी ८ वाजता संथगतीने मतदानास प्रारंभ झाला होता. परंतु जसजसा सूर्य डोक्यावर येत गेला तसतसा मतदारांमधील उत्साह सुद्धा वाढताना दिसला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले.

२०१३च्या निवडणुकीत सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते. २००८ सालच्या ५७.५८ टक्क्यांच्या तुलनेत ते ९ टक्के अधिक होते. या निवडणुकीत सरासरी ६७.१४ टक्के मतदान झाले.

एक्झिट
पोल काय म्हणतात?
संस्थाआपभाजपाकाँग्रेस
एबीपी-नेल्सन३९ (३७%)२८ (३२%)३ (१९%)
झी टीव्ही-सीव्होटर३५ (४२%)३१ (४०%)३ (११%)
इंडिया टुडे-सिसरो३८-४६ (४१%)१९-२७ (३७%)३-५ (१५%)
न्यूज नेशन४१-४५ (४७%)२३-२७ (३९%)१-३ (११%)
न्यूज२४-चाणक्य४८ (४३%)२२ (३७%)० (१३%)
इंडिया न्यूज-एक्सिस५३ (सर्वाधिक)१७२

...तर भाजपाचे स्वप्न अधुरेच
मतदारांचा नूर लक्षात घेता दिल्ली विधानसभा काबीज करण्याचे भाजपाचे १७ वर्षांपासूनचे स्वप्न याखेपेसही अधुरेच राहण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास यावर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०१६ साली पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना बळ मिळणार आहे.

एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत बैठक झाली. आम आदमी पार्टीला कौल दिसत असला तरी आम्हीच बाजी मारू असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: Delhi's Kaul, AAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.