धक्कादायक! हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:36 PM2023-10-21T18:36:55+5:302023-10-21T18:37:43+5:30
राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील टिळक नगर भागात परदेशी मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना घडली. शुक्रवारी शाळेबाहेर एका महिलेचा मृतदेह सापडला आणि खळबळ माजली. कारमध्ये महिलेचा मृतदेह साखळीने बांधलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना संशय असलेला आरोपी गुरप्रीत सिंग याला अटक करण्यात आली आहे. लीना बर्गर असे मृत महिलेचे नाव असून ती स्वित्झर्लंडची रहिवासी आहे. दिल्लीत परदेशी नागरिकाची हत्या झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत आणि लीना बर्जर यांची स्वित्झर्लंडमध्ये भेट झाली त्यानंतर त्यांची मैत्री झाली.
'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत सिंग हा मृत महिलेला भेटण्यासाठी अनेकदा स्वित्झर्लंडला जायचा. गुरप्रीत सिंगला लीनाचे दुसर्या पुरुषासोबत अफेअर असल्याचा संशय होता, त्यानंतर त्याने लीनाला भेटण्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी भारतात बोलावले आणि नंतर तिची हत्या करण्याचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी आरोपी गुरप्रीतने महिलेला काही बहाण्याने एका खोलीत नेले आणि नंतर त्याची परदेशी मैत्रीण लीनाचे हात पाय साखळीने बांधून तिची हत्या केली. खरं तर मृतदेहावर छेडछाडीच्या खुणा देखील दिसत होत्या, तेही अर्धवट प्लास्टिकच्या पिशवीत भरलेल्या अवस्थेत होते. महिलेची इतरत्र हत्या करून पांढऱ्या सँट्रो कारमधून घटनास्थळी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पगडीधारी व्यक्तीसह दोन संशयित दिसत होते.
मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला
तसेच गुरप्रीत सिंगने एका महिलेच्या आयडीवर जुनी कार खरेदी केली आणि नंतर विदेशी महिलेचा मृतदेह कारमध्ये टाकून ती पार्क केली. मात्र, लीनाच्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यावर आरोपी गुरप्रीतने त्याच जुन्या कारचा वापर करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आता गुरुप्रीतला अटक केली असून त्याच्या घरातून २.२५ कोटी रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून दोन वाहने देखील जप्त केली आहेत. एक कार ज्यामध्ये मृतदेह फेकण्यात आला आणि दुसरी नॅनो कार, ही देखील गुरप्रीत सिंगची असल्याचे उघड झाले आहे.