दिल्लीत पाणी सुद्धा खराब; गुणवत्ता रँकिंग यादीत 'मुंबई' टॉप!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:08 PM2019-11-16T16:08:31+5:302019-11-16T16:12:13+5:30
देशातील 21 शहरांची यादी जाहीर
नवी दिल्ली : दिल्लीतील हवा नाही तर पाणी सुद्धा प्रदूषित आहे. केंद्र सरकारने देशातील 21 शहरांतील पाण्याची चाचणी केली. यात मुंबईतीलपाणी सर्वोत्तम म्हणजेच स्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. तर दिल्लीतील पाणी खराब असल्याचे आढळून आले. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी पाण्यातील गुणवत्तेच्या आधारावर देशातील 21 शहरांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत मुंबई, हैदराबाद, भुवनेश्वर, रांची आणि रायपूर टॉपमध्ये आहेत. त्यानंतर अनुक्रमे अमरावती, शिमला, चंदीगड, त्रिवेंद्रम, पटना, भोपाळ, गुवाहाटी, बंगळुरू, गांधीनगर, लखनऊ, जम्मू, जयपूर, डेहराडून, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली आहे.
केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सला (बीआयएस) देशातील विविध शहरांतील पाण्याचे नमुने एकत्र करून त्यासंबंधी चौकशी करण्याचे आणि त्यानुसार रँकिंग जारी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार, आज रामविलास पासवान यांनी पाणी गुणवत्ता अहवाल आणि रँकिंग जारी केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पाण्याची चाचणी 10 मानकांवर करण्यात आली आहे.
Union Minister Ram Vilas Paswan: Mumbai tops ranking released by Bureau of Indian Standards (BIS) for quality of tap water. Delhi at the bottom, with 11 out of 11 samples failing on 19 parameters. pic.twitter.com/3nuLuXAuqw
— ANI (@ANI) November 16, 2019
मुंबईतील पाणी प्रत्येक मानकांमध्ये पास झाले आहे. तर मानकांनुसार, इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे."
याचबरोबर, देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. याशिवाय, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभियान सुरूच राहिल. नरेंद्र मोदींनी 2024 पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोचविणार म्हटले आहे. त्या दिशेने आमचे सरकार काम करत आहे, असेही रामविलास पासवान यांनी सांगितले.