डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी; Zomato ने शेअर केली आपल्या कर्मचाऱ्याची यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 07:37 PM2023-07-24T19:37:06+5:302023-07-24T19:38:14+5:30
विग्नेशने झोमॅटोमध्ये काम करत अभ्यास सुरू केला आणि तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली.
तामिळनाडूतील एका Zomato डिलिव्हरी बॉयची यशोगाथ सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करताना त्याने तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. झोमॅटो कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवरुन आपल्या कर्मचाऱ्याचे यशाची माहिती दिली. ट्विटर युजर्स कमेंट सेक्शनमध्ये त्या तरुणाचे जोरदार कौतुक करत आहेत.
विघ्नेश असे या तरुणाचे नाव आहे. तो Zomato मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. कामासोबत त्याने तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. या परीक्षेचा निकाल 12 जुलै रोजी जाहीर झाला. यात विघ्नेश पास झाला आणि आता तो तामिळनाडूत सरकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहे.
drop a like for Vignesh, who just cleared Tamil Nadu Public Service Commission Exam while working as a Zomato delivery partner ❤️ pic.twitter.com/G9jYTokgR5
— zomato (@zomato) July 24, 2023
Zomato ने आज ट्विटरवर फोटो शेअर केला असून, यात विघ्नेश त्याच्या कुटुंबासह स्टेजवर उभा दिसत आहे. झोमॅटोने कॅप्शनमध्ये लिहिले - विघ्नेशसाठी एक लाइक, त्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताना तमिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. या पोस्टला आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक युजर्सनी विघ्नेशचे कौतुक केले आहे.