COVID-19: जिभेला सूज, तोंडात फोड येणे अन् दातदुखी; कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 08:06 PM2022-03-30T20:06:32+5:302022-03-30T20:07:30+5:30
कोरोना महामारीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात आपल्याला या विषाणूबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण अजूनही कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिअंट जसे समोर येत आहेत तशी कोरोनाची लक्षणं देखील बदलत आहेत.
नवी दिल्ली-
कोरोना महामारीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात आपल्याला या विषाणूबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण अजूनही कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिअंट जसे समोर येत आहेत तशी कोरोनाची लक्षणं देखील बदलत आहेत. ताप, खोकला, थकवा, चव आणि वास जाणे ही तर कोरोनाची प्राथमिक लक्षणं तर आहेतच पण त्यात आता आणखी वेगवेगळ्या लक्षणांची वाढ होत आहे. लसीकरण जरी वेगानं होत असलं तरी विषाणूचे नवे व्हेरिअंट आढळून येत असल्यानं संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. नुकत्याच एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की कोरोना विषाणूची इतरही काही लक्षणं आहेत. जी नव्यानं समोर आली आहेत. यातील काही लक्षणं अगदीच असामान्य आहेत. यामध्ये तोंड, दात आणि जीभ यांचा समावेश होतो.
कोरोना विषाणूचा दातांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
कोरोना व्हायरस ACE2 नावाच्या रिसेप्टर्सद्वारे आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतो आणि हे रिसेप्टर्स आपल्या तोंड, जीभ आणि हिरड्यांमध्ये देखील असतात. त्यामुळे, ज्या लोकांची 'ओरल हेल्थ' खराब आहे त्यांच्याकडे ACE2 रिसेप्टर्स जास्त असतात. संशोधनात असंही दिसून आले आहे की दातांच्या खराब समस्या असलेले लोक देखील गंभीर COVID-19 संसर्गास बळी पडू शकतात.
जिभेवर कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती?
कोरोना विषाणूचा तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. याची लागण झालेल्या अनेक रुग्णांना तोंडात फोड येणे, जिभेवर सूज येणे, तसंच काहींनी तोंडात व्रण येण्याच्या तक्रारीही केल्या आहेत. अशा लक्षणांमुळे जेवण करताना अस्वस्थता येते. तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनामुळे जीभही प्रभावित होऊ शकते. यामध्ये रुग्णाला जिभेच्या पृष्ठभागावर जळजळ आणि सूज जाणवू शकते. हे प्रतिजैविकांच्या जास्त भारामुळे देखील होऊ शकतं.
या लक्षणांबद्दल कमी का बोललं जातं?
या लक्षणांची मुख्यतः दोन कारणांसाठी कमी चर्चा केली जाते. पहिलं कारण म्हणजे ही लक्षणे असामान्य आहेत, म्हणजेच ती सर्व रुग्णांमध्ये नोंदवली जात नाहीत. ही लक्षणं कमी रुग्णांमध्ये आढळतात, त्यामुळे त्यांच्याबाबत जास्त चर्चा होत नाही. दुसरं कारण म्हणजे ही लक्षणं विषाणूच्या इतर लक्षणांपेक्षा कमी गंभीर स्वरुपाची आहेत.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या इशाऱ्यानुसार ओमायक्रॉनची लक्षणं जसे की सौम्य सर्दी आणि फ्लू याकडे दुर्लक्ष करू नये. नवा व्हेरिअंट डेल्टा पेक्षा कमी गंभीर असू शकतो, परंतु तरीही हा एक सौम्य रोग नाही, असाही सावधानतेचा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे.