महाराष्ट्रासह 11 राज्यांत आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 06:50 AM2021-06-26T06:50:16+5:302021-06-26T06:50:44+5:30

महाराष्ट्राला राहावे लागेल सावध; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

Delta Plus patients found in 11 states including Maharashtra pdc | महाराष्ट्रासह 11 राज्यांत आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

महाराष्ट्रासह 11 राज्यांत आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

Next

-नितीन अग्रवाल

नवी  दिल्ली : महाराष्ट्राला लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना जास्त सावध राहावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, राज्यात आजही अनेक जिल्ह्यांत संक्रमणाचा दर सुरक्षित स्तरापेक्षा जास्त असल्यामुळे धोका टळलेला नाही. महाराष्ट्रात १ तर मध्यप्रदेशात डेल्टा प्लसच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, सातारा, पालघर आणि उस्मानाबादेत आजही संक्रमणाचा दर पाच ते ९ टक्के आहे. म्हणून तेथे जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असे भार्गव म्हणाले. नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे (एनसीडीसी) संचालक डॉ. सुजित कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातच संक्रमणाचा सर्वांत जास्त प्रभाव होता आणि सर्वांत जास्त म्युटेशनही महाराष्ट्रातूनच मिळाले. 

महाराष्ट्रात सर्वांत जास्त

डॉ. सुजित यांनी सांगितले की, ४५ हजार नमुन्यांपैकी देशात ४८ रुग्णांत डेल्टा प्लसची ओळख पटली आहे. त्यात सर्वांत जास्त २० रुग्ण महाराष्ट्र आणि नऊ तामिळनाडूतील आहेत. याशिवाय मध्यप्रदेश ७, केरळ ३. पंजाब आणि गुजरातमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. ओदिशा, राजस्थान, जम्मू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही एकेक रुग्ण सापडला आहे.

डेल्टा प्लसबद्दल डॉ. सुजित कुमार म्हणाले की, त्यात प्रतिकार क्षमतेला चुकवून अँटीबॉडीला निष्क्रिय करण्याची क्षमता आहे व काळजीचे हेच कारण आहे. अर्थात त्याचे रुग्ण खूप कमी असून, वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर त्याबाबत काही म्हणता येत नाही.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त म्युटेशन का?

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘राज्यात सर्वांत जास्त लोक संक्रमित झाले. त्यामुळे विषाणूला पसरण्यास तेथेच जास्त संधी मिळाली. याच कारणामुळे विषाणूला स्वरूप बदलण्याची संधी महाराष्ट्रातच मिळाली. आम्ही सावध राहून कोविडच्या नियमांचे पालन केले नाही तर संख्या वाढेल व नव्या लाटेचे संकट येईल.’

डेल्टा प्लसवर लस  किती परिणामकारक ?

भार्गव म्हणाले की, ‘सध्याची लस कोरोनाच्या डेल्टा प्लसवर किती परिणामकारक आहे हे येत्या ७ ते १० दिवसांत समजेल. सध्या देशात १०-१२ राज्यांत याचे फक्त ४८-४९ रुग्ण समोर आले आहेत.’ कोरोना विषाणू दबाव पडल्यावर सुरक्षित राहण्यासाठी स्वत:ला म्युटेशनच्या माध्यमातून बदलून घेतो. ते उपचारानंतर लस, प्लाझ्मा आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या कारणामुळेही होऊ शकते. याशिवाय मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन न केल्यास त्याला जास्त संधी मिळते आणि जास्त म्युटेशन होतात. या परिस्थितीत विषाणूला जास्त शक्तिशाली होण्याची संधी मिळते.  विषाणूने कितीही रूप बदलले तरी बचावासाठी सतर्कता आणि लसीकरणात कोणताही बदल नाही, असे भार्गव म्हणाले.

Web Title: Delta Plus patients found in 11 states including Maharashtra pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.