CoronaVirus News: दोन्ही लसी घेऊनही डेल्टा प्लसने गाठलेच; 'त्या' महिलेनं वाढवली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 12:45 PM2021-06-27T12:45:45+5:302021-06-27T12:46:07+5:30
CoronaVirus News: राजस्थानात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला
जयपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे दुसरी लाट आली होती. आता याच व्हेरिएंटचं म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. डेल्टा प्लस जास्त संक्रामक असल्यानं तो वेगानं हातपाय पसरत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यासाठी डेल्टा प्लस कारणीभूत ठरेल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
राजस्थानात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बिकानेरमध्ये ६५ वर्षीय महिलेला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. या महिलेनं कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तिनं कोरोनावर मात केली होती. महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर ३० मे रोजी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (एनआयव्ही) नमुने पाठवण्यात आले होते. शुक्रवारी याबद्दलचा अहवाल आला. त्यातून डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं.
एका ६५ वर्षीय महिलेला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचं बिकानेरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. ओ. पी. चहर यांनी सांगितलं. 'संबंधित महिला कोरोनामुक्त झाली होती. डेल्टा प्लसशी संबधित ही राज्यातील पहिलीच केस आहे. महिलेमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नव्हती. तिला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते,' अशी माहिती चहर यांनी दिली.