CoronaVirus News: भारतात कशामुळे आली कोरोनाची दुसरी लाट? समोर आलं महत्त्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:37 AM2021-06-05T06:37:48+5:302021-06-05T07:45:51+5:30
इतर विषाणूंपेक्षा घातक; मोठ्या प्रमाणावर संसर्ग
नवी दिल्ली : भारतामध्ये आढळलेला कोरोनाचा डेल्टा हा नवा विषाणू पूर्वीच्या प्रकारांपेक्षा अतिशय घातक व अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळेच कोरोनाची दुसऱ्या लाट निर्माण होऊन संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला असे केंद्र सरकारने केलेल्या एका पाहणीतून आढळून आले आहे.
या डेल्टा विषाणूला बी.१.६१७.२ या नावानेही ओळखले जाते. ब्रिटनमधील केंट येथे सापडलेल्या अल्फा या कोरोना विषाणूपेक्षा हा नवीन प्रकारचा विषाणू घातक आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला.
देशात कोरोनाची दुसरी लाट का आली या कारणांचा या पाहणीद्वारे शोध घेण्यात आला. अल्फा विषाणूपेक्षा डेल्टा विषाणूची संसर्गक्षमता ५० टक्के अधिक आहे. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याला डेल्टा विषाणू कारणीभूत आहे का याबद्दलचे ठोस पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत.
इंग्लंडमधील कोरोना विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचइ) या संस्थेने सांगितले की, अल्फाच्या तुलनेत डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र असे का घडले याचा आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे. डेल्टा विषाणूमुळे कोरोनाची समस्या आणखी गंभीर बनल्यामुळे नागरिकांनी यापुढे काटेकोरपणे प्रतिबंधक उपायांचे पालन करत राहिले पाहिजे असे पीएचइ या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
देशात कोरोनाचे १२,२००पेक्षा अधिक प्रकार आढळून आले आहेत. जिनोमिक सिक्वेन्सिंगद्वारे हे प्रकार भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. मात्र डेल्टा विषाणूच्या तुलनेत हे विषाणू कमी घातक आहेत.
महाराष्ट्रासह पाच राज्यांत सर्वाधिक प्रादुर्भाव
डेल्टा विषाणू सर्वच राज्यांत आढळले असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, तेलंगण या राज्यांत आढळून आला आहे.
भारतातील २९००० हजार कोरोना विषाणू नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातील ८९०० नमुन्यांमध्ये डेल्टा विषाणू आढळून आला.
विषाणू वुहान प्रयोगशाळेतूनच : डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन : चीनचा विषाणू हा वुहान प्रयोगशाळेतून येतोय, असे मी जे म्हणत होतो ते बरोबर होते. आता प्रत्येकजण एवढेच काय तथाकथित ‘शत्रूही’ ट्रम्प जे म्हणत होते ते बरोबर आहे, असे म्हणत आहेत, असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटले. प्रयोगशाळेतून जो विषाणू बाहेर पडला त्यामुळे घडलेले मृत्यू आणि विध्वंस यासाठी चीनला दंड आकारावा.
कोरोनामुळे जे मृत्यू व विध्वंस झाला त्याबद्दल चीनने अमेरिका आणि जगाला १० ट्रिलियन डॉलर्स दिले पाहिजेत. अमेरिकेचे कोरोना विषाणूवरील सल्लागार डॉ. अँथोनी फौसी आणि चीन यांच्यातील पत्रव्यवहार एवढा स्पष्ट आहे की त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही, असे ट्रम्प म्हणाले.